महाराष्ट्र ताज्या बातम्या

₹2.5 कोटींच्या रस्त्यावर दोन वर्षांत खड्डे; भर पावसात महाड नगरपालिकेची ‘मलमपट्टी’!

महाड बस स्थानक ते राष्ट्रीय महामार्ग मार्गावरील खड्डेमय रस्त्यावर पावसाळ्यात सुरू असलेले दुरुस्तीचे काम

महाड बस स्थानक–राष्ट्रीय महामार्ग मार्गाची दुरवस्था; अपूर्ण गटारांमुळे पाणी रस्त्यावर, नव्या काँक्रिट रस्त्यावरील तड्यांमुळेही कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न

महाड : कोकणातील महत्त्वाचे मध्यवर्ती आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाड एसटी बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अवघ्या दोन वर्षांत खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. सुमारे अडीच कोटी रुपये खर्च करून करण्यात आलेल्या डांबरीकरणानंतर आता भर पावसात रेडिमेड डांबरमिश्रित साहित्य टाकून खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आल्याने या तात्पुरत्या दुरुस्तीचे आयुष्य किती, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

महाड बस स्थानकाकडे येणारा हा रस्ता एसटी महामंडळाच्या मालकीचा असून, राज्य शासनाच्या विशेष रस्ता अनुदान योजनेतून 2024 मध्ये त्याच्या डांबरीकरणासाठी सुमारे ₹2.5 कोटींचा निधी खर्च करण्यात आला होता. या कामाचे उद्घाटन 7 ऑक्टोबर 2024 रोजी महाडचे आमदार, विद्यमान फलोत्पादन मंत्री आणि तत्कालीन एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र रस्ता पूर्ण झाल्यानंतरपासूनच त्याच्या गुणवत्तेबाबत नागरिकांकडून तक्रारी करण्यात येत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. आता दोन वर्षांच्या आतच अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने एवढ्या मोठ्या खर्चानंतर रस्त्याची अशी अवस्था का झाली, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

गटारे बांधली; पण पाणी रस्त्यावरच

डांबरीकरणासोबत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गटारे बांधण्यात आली. मात्र काही ठिकाणी गटारांचे काम अपूर्ण राहिल्याने पावसाचे पाणी योग्य प्रकारे निचरा न होता रस्त्यावर येत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. गटारांमध्ये पाणी साचून राहत असल्याने परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याचेही स्थानिक सांगतात. महाडमधील रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या समस्येबाबत नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या; मात्र अपेक्षित कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मे महिन्यात डागडुजी; पावसाळ्यात पुन्हा खड्डे

या मार्गावर एका बाजूला पडलेल्या खड्ड्यांबाबत नागरिकांनी मे महिन्यात तक्रारी केल्यानंतर नगरपरिषदेने ठेकेदारामार्फत तात्पुरती दुरुस्ती केली होती. मात्र त्यावेळी खड्ड्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती न झाल्याने पावसाळ्यात पुन्हा मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याचे दिसत आहे. आता भर पावसात या खड्ड्यांमध्ये पारंपरिक पद्धतीने गरम डांबराचा वापर न करता रेडिमेड डांबरमिश्रित साहित्य टाकून बुजविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मुसळधार पावसात केलेली ही डागडुजी किती दिवस टिकणार, असा प्रश्न वाहनचालक उपस्थित करीत आहेत.

महाड बस स्थानक–राष्ट्रीय महामार्ग मार्गावरील खड्ड्यात रेडिमेड डांबरमिश्रित साहित्य टाकून दुरुस्ती करताना कामगार. मुसळधार पावसाच्या काळात करण्यात येणारी ही दुरुस्ती किती काळ टिकणार, असा प्रश्न वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे.

नव्या काँक्रिट रस्त्यालाही तडे

याच पार्श्वभूमीवर महाड शहरातून जाणाऱ्या गांधारी पूल ते केभुर्ली मार्गावरील नव्या सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या कामावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. या कामात संबंधित ठेकेदाराचा पोटठेकेदार म्हणून सहभाग असल्याचे सांगण्यात येत असून, रस्ता तयार झाल्यानंतर अल्पावधीतच काही ठिकाणी तडे दिसून आल्याची नागरिकांची तक्रार आहे. या तड्यांचे नेमके कारण काय, कामाच्या गुणवत्तेची तांत्रिक तपासणी करण्यात आली आहे का आणि दुरुस्तीची जबाबदारी कोणाची, याबाबत नगरपरिषदेने स्पष्टता द्यावी, अशी मागणी होत आहे.

शहरातील रस्ते आधीच खोदकामाने त्रस्त

महाड शहरात भुयारी गटार योजना, भूमिगत विद्युत केबल, पाणीपुरवठा पाइपलाइन आणि इतर पायाभूत कामांसाठी अनेक रस्त्यांवर वारंवार खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील अनेक अंतर्गत रस्त्यांची अवस्था आधीच खराब झाली आहे. अशा परिस्थितीत तुलनेने चांगला मानला जाणारा बस स्थानक–राष्ट्रीय महामार्ग मार्गही खड्डेमय झाल्याने वाहनचालक आणि प्रवाशांमध्ये नाराजी वाढली आहे. महाड बस स्थानक हे कोकणातील महत्त्वाचे वाहतूक केंद्र असल्याने या रस्त्यावर एसटी बसेससह प्रवासी वाहने आणि इतर वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे केवळ गैरसोयीचेच नव्हे तर अपघाताचा धोका वाढविणारे ठरत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मुख्याधिकारी म्हणतात, पाहणी करून दुरुस्ती करू

या संदर्भात महाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्याशी संपर्क साधला असता, “संबंधित रस्त्याची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करून घेतली जाईल,” असे त्यांनी सांगितले. मात्र अडीच कोटी रुपये खर्चून अवघ्या दोन वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या रस्त्यावर भर पावसात पुन्हा तात्पुरती मलमपट्टी करण्याची वेळ का आली, मूळ कामाच्या गुणवत्तेची तपासणी होणार का आणि संबंधित ठेकेदाराची जबाबदारी निश्चित केली जाणार का, हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.

₹2.5 कोटींचा खर्च, दोन वर्षांत खड्डे आणि आता पावसात डागडुजी—महाडकरांसाठी हा रस्ता विकासकामापेक्षा ‘मलमपट्टीचा रस्ता’ ठरणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Milind Mane

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात