टवी
महाड
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तेरा ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल रविवारी जाहीर झाला. या ग्रामपंचायतींपैकी दहा ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचे आमदर भरत गोगवले यांचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. उर्वरित तीन ग्रामपंचायती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडे गेल्या आहेत.
महाड तालुक्यातील बावळे ग्रामपंचायतमध्ये केवळ सदस्य पदासाठी निवडणूक घेण्यात आली होती. महाडमध्ये २१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. यातील ८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने तालुक्यात शेल, चांढवे बु., किंजलोली खुर्द, कोतुर्डे, तळोशी, नांदगांव बु., नेराव, टोळ बु., तेलंगे, तेलंगे मोहल्ला, रावढळ आणि बावले आशा १३ ग्रामपंचायतीमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. सोमवारी सकाळी घेण्यात आलेल्या मतदानाचा निकाल जाहीर करण्यात आला.
महाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये सकाळी दहा वाजता या मतमोजणी प्रक्रियेस सुरुवात झाली. सहा टेबलवर मतमोजणी करण्यात आली. याकरिता जवळपास ६० कर्मचारी आणि ८० पोलीस बंदोबस्त करता तैनात होते.
महाड तालुक्यात १३ ग्रामपंचायतींपैकी १० ग्रामपंचायतीवर आमदार गोगावले यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेचे वर्चस्व कायम ठेवले आहे. येथील रावढळ ग्रामपंचायतीवर नामदेव हरिश्चंद्र रेशीम, किंजलोळी खु. ग्रामपंचायतीवर कोमल गौरव भालेकर, कोथुर्डे – अंकुश लक्ष्मण पवार, काचले – योगिता रुपेश केमडेकर, नेराव – बाबुराव सिताराम सुतार, तेलंगे मोहल्ला – सुवर्णा महादेव धोंडगे, तेलंगे – सायली राकेश मनवे, अशी सरपंचपदी विजयी उमेदवारांची नावे आहेत.
यातील प्रतिष्ठेची असलेली टोळ बुद्रुक ग्रामपंचायत ही शिंदे गटाच्या हातातून गेली आहे. या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने विजय प्राप्त केलेला आहे. निकाल जाहीर होतात विजयी उमेदवारांनी महाडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकच जल्लोष साजरा केला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता.