महाड : महाड जवळील सावित्री खाडीपात्रात मुठवली आणि केंबुर्ली या ठिकाणी सुरू असलेल्या अनधिकृत वाळू उत्खननावर जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी केलेल्या धडक कारवाईत सुमारे ३० लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार महेश शितोळे यांनी दिली.
१ मे, महाराष्ट्र दिनाच्या रात्री, खनिकर्म विभागाच्या पथकाने अचानक छापा टाकत मुठवली येथील ओरिएंटल लिमिटेड कंपनीच्या वाळू डेपोवर आणि केंबुर्ली परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशावर कारवाई केली. या कारवाईदरम्यान सुमारे १३० ब्रास अनधिकृत वाळू साठा जप्त करण्यात आला.
शेतकऱ्यांचा करारनामाही चौकशीत
या प्रकरणात ओरिएंटल लिमिटेड कंपनीविरोधात तसेच त्या कंपनीसोबत जमिनीच्या करारनाम्यावर सहमती दर्शवणाऱ्या शेतकऱ्यांविरोधातही कारवाई करण्यात आली आहे. पंचनामा करून एकूण वाळू साठा जप्त करण्यात आला असून त्यावर सुमारे ३० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
”अन्य ठिकाणीही कारवाई होणार” – तहसीलदार शितोळे
“या कारवाईमुळे इतर ठिकाणी सुरू असलेल्या अनधिकृत उत्खननाला आळा बसेल अशी अपेक्षा आहे. जिल्ह्यात ज्या ठिकाणी अनधिकृत वाळू उपसा सुरू आहे, तिथेही लवकरच कारवाई केली जाईल,” अशी स्पष्ट भूमिका तहसीलदार महेश शितोळे यांनी मांडली.