मुंबई : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आज वयाच्या ८६ व्या वर्षी मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात निधन झालं. त्यांना काल २२ फेब्रुवारी रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. प्रगल्भ नेतृत्व हरपल्यामुळे महाराष्ट्र शोकाकूल झाला आहे. विविध पक्षांच्या नेत्यांनी मनोहर जोशींची आठवण व्यक्त करीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा सुसंस्कृत नेता हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान, विश्वासू सहकारी अशी जोशी सरांची ओळख होती. शिवसेना पक्षस्थापनेपासून पक्षसंघटनेत त्यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या. विधान परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. मुंबईचे महापौर म्हणून त्यांची कारकीर्द उल्लेखनीय, संस्मरणीय ठरली. शिवसेना भाजपच्या युतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जोशी सरांना दिली. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा महाराष्ट्रात उमटवला. दिल्लीच्या राजकारणात केंद्रीय अवजड उद्योगमंत्री म्हणून त्यांनी काम केले. लोकसभेचे अध्यक्ष म्हणून नि:ष्पक्ष भूमिका त्यांनी बजावली. सामान्य कुटुंबात जन्मलेल्या जोशी सरांनी स्वकर्तृत्वावर लोकसभेच्या अध्यक्षपदापर्यंत मजल मारली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या प्रत्येक संधीचे त्यांनी सोने केले.
आदरणीय जोशी सरांच्या निधनाने सुसंस्कृत, प्रगल्भ नेतृत्व हरपले – विजय वडेट्टीवार
नगरसेवक, महापौर, राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, लोकसभा अध्यक्ष अशी विविध महत्वाची पदं भूषविणाऱ्या आदरणीय जोशी सरांचं व्यक्तिमत्व सर्वांसाठी प्रेरणादायी होते. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत त्यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहणारे आहे. व्यासंगी राजकारणी ही त्यांची ओळख सर्वशृत आहे. लोकशाहीचा पुरस्कार करणारे, विकासाचा ध्यास असणारे ते नेते होते. कोहिनूर सारख्या विविध संस्थांच्या माध्यमातून सरांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, सिंचनातील कृष्णा खोरे विकास महामंडळाची सुरुवातही, टॅकरमुक्त महाराष्ट्र घोषणा, महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवातही आदरणीय जोशी सरांच्या प्रयत्नाने झाली. लोकसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला.
जोशी यांच्या निधनाने निष्ठावंत, अनुभवी, सुसंस्कृत नेतृत्व हरपले! – नाना पटोले
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून आलेल्या मनोहर जोशी सरांनी अत्यंत निष्ठेने आणि मेहनतीने मुंबईचे नगरसेवक, महापौर, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, लोकसभा अध्यक्ष असा प्रदीर्घ राजकीय प्रवास केला. आपल्या राजकीय जीवनात त्यांनी अनेक चढऊतार पाहिले पण कधीही निष्ठा आणि विचारांशी तडजोड केली नाही. आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी ते लढत राहिले. राजकारणासोबतच महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सांस्कृतीक, कला क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
१९६६ पासून शिवसेनेचा धगधगता इतिहास पाहिलेले एक शिवसैनिक गेले – राज ठाकरे
मनोहर जोशी सरांचं निधन झालं. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यापासून त्यांच्या सोबतच्या पहिल्या फळीतील ते ज्येष्ठ नेते. शिवसेनेची धाटणीच आक्रमक, पण त्यात अजातशत्रुत्व जपत सरांची राजकीय वाटचाल सुरु राहिली. शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं जे मनोहर जोशींच्या रूपाने पूर्ण झालं. पुढे ते लोकसभा अध्यक्ष झाले आणि नंतर शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांचे सैनिक म्हणून राहिले. १९६६ पासून शिवसेनेचा धगधगता इतिहास पाहिलेले आणि जगलेले एक शिवसैनिक, नेते आज काळाच्या पडद्याआड गेले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनोहर जोशी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.
 
								 
                                 
                         
                            
