मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या चित्रपट व संगीत क्षेत्रातील जीवनगौरव पुरस्कारांची घोषणा आज सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. यामध्ये चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव व विशेष योगदान पुरस्कार, स्व. राज कपूर जीवनगौरव व विशेष योगदान पुरस्कार तसेच गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार यांचा समावेश आहे.
या वर्षीचा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप ₹१० लाख रोख, स्मृतीचिन्ह, मानपत्र व चांदीचे पदक असे आहे.
चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार यंदा गुणी अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना प्रदान केला जाणार आहे. या पुरस्कारासोबत ₹६ लाख रोख, स्मृतीचिन्ह, मानपत्र व चांदीचे पदक दिले जाईल.
हिंदी चित्रपटसृष्टीतील अत्युच्च सन्मान मानला जाणारा स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार यंदा बहुआयामी अभिनेते अनुपम खेर यांना जाहीर झाला आहे. तर स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रतिभावान अभिनेत्री काजोल देवगण यांना देण्यात येणार आहे. यापैकी जीवनगौरव पुरस्काराचे रोख स्वरूप ₹१० लाख तर विशेष योगदान पुरस्काराचे ₹६ लाख आहे.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, जो १९९३ पासून देण्यात येतो, यावर्षी ज्येष्ठ मराठी गझल गायक भीमराव पांचाळे यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप ₹१० लाख रोख रक्कम, मानचिन्ह, मानपत्र व शाल असे आहे.
सर्व पुरस्कारांचे वितरण २५ एप्रिल २०२५ रोजी एन.एस.सी.आय. डोम, मुंबई येथे एका भव्य सोहळ्यात करण्यात येणार आहे.
याशिवाय, संविधान अमृत महोत्सव आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने सांस्कृतिक कार्य विभागातर्फे २० एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६:३० वाजता गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथे एक विशेष सांगीतिक मानवंदना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात सुरेश वाडकर, आदर्श शिंदे, वैशाली सामंत, उर्मिला धनगर, नंदेश उमक आदी कलाकार सहभाग नोंदवणार असून, सुबोध भावे सूत्रसंचालन करतील. कार्यक्रमात डॉ. आंबेडकरांच्या जीवनावर आधारित गीतं, नाट्यप्रवेश व नृत्य सादर केले जाणार आहेत.
हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, सन्मानिका प्रवेशपत्रे शिवाजी नाट्य मंदिर व रवींद्र नाट्य मंदिर येथे ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर वितरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती ॲड. शेलार यांनी यावेळी दिली.