मुंबई – मंत्रालयातील ७ व्या मजल्यावर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाबाहेरील छताचा काही भाग अचानक कोसळल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने घटनेच्या वेळी कोणीही त्या ठिकाणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
या घटनेमुळे या मजल्यावर काम करणारे कर्मचारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. याच विभागात राज्यभरातून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे नातेवाईक आणि नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते.
घटनास्थळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, छताच्या भागाला गंज लागल्याने आणि संरचनात्मक दुर्लक्षामुळे ही घटना घडली असावी. विशेष म्हणजे, काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे देखील इमारतीच्या जुन्या भागांवर परिणाम झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
घटनेनंतर प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचे काम सुरू केले असून, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून इतर मजल्यांवर व विभागांमध्ये पाहणी सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, मंत्रालयातील देखभाल व दुरुस्तीच्या कामांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. “सरकारी इमारतींच्या देखभालीसाठी खर्च केला जातो खरा, पण कामाची गुणवत्ता आणि नियमित तपासणी यांकडे दुर्लक्ष केले जात आहे का?” असा सवाल उपस्थित होत आहे.