नवी दिल्ली
मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षणावरून संघर्ष सुरू आहे. त्यामुळे आज सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष आहे.
राज्य सरकारने 13 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिवह पिटीशन म्हणजेच पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यानंतर आज यावर पहिली सुनावणी होणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीडाने दिलेल्या निर्णयामुळे मराठा आरक्षण 5 मे 2021 रोजी रद्द केलं होतं. याचा पुनर्विचार करण्यासाठी राज्य सरकारने ही याचिका दाखल केली.
पुनर्विचार याचिका म्हणजे काय?
सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेल्या प्रकरणावर पुन्हा विचार करावा यासाठी पुनर्विचार याचिका दाखल केली जाते. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्याच्या 30 दिवसात ही याचिका दाखल करावी लागते. नेमक्या कोणत्या आधारावर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येत आहे, याचं स्पष्टीकरण याचिकाकर्त्याला देणं अनिवार्य असतं. याशिवाय याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ वकिलांकडून प्रमाणित करून घ्यावी लागते. यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वात वरिष्ठ तीन न्यायाधीशांकडे पाठवली जाते. ज्यात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतात. यावर पुन्हा सुनावणी व्हावी की नाही हे न्यायाधीश बहुमताने ठरवतात.