मुंबई – “पटक पटक के मारूंगा” अशी मराठी माणसाला दिलेली धमकी अद्याप विसरलेली नाही आणि त्याच पार्श्वभूमीवर गुरुवारी संसदेत महाराष्ट्राच्या तिघी महिला खासदारांनी ‘जय महाराष्ट्र’चा नारा देत मराठी स्वाभिमानाची मशाल पेटवत भाजप खासदार निशिकांत दुबे यांना चोख प्रत्युत्तर दिलं. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर आणि शोभा बच्छाव या तीन महिला खासदारांनी घेतलेल्या या रोखठोक भूमिकेचं आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून भरभरून कौतुक होत आहे.
या कृतीचं मनापासून स्वागत करत मनसे नेते अविनाश जाधव यांनी या तिघी महिला खासदारांचा त्यांच्या मतदारसंघात जाऊन सत्कार करण्याची घोषणा केली. “पुरुष खासदारांकडून अपेक्षा होत्या, पण या तिघी भगिनीच उभ्या राहिल्या. त्यांनी मराठीसाठी आवाज उठवला, उद्या गरज पडल्यास मनसे त्यांच्या मागे खंबीरपणे उभी राहील,” असा ठाम संदेशही त्यांनी दिला.
संसदेच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसच्या या तिघी खासदारांनी केलेल्या निष्पन्न कृतीने निशिकांत दुबे यांना संसदेतच अडचणीत आणलं. “जय महाराष्ट्र”च्या घोषणांनी संसद गजबजून गेली आणि मराठी अस्मितेला पुन्हा एकदा देशाच्या राजकारणात जागा मिळाली.

दरम्यान, खासदार निशिकांत दुबे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर याआधीच राज ठाकरे यांनी “मुंबईत ये, समुद्रात दुबो… दुबो के मारूंगा” असा थेट इशारा दिला होता. आता काँग्रेसच्या या तीन खासदार भगिनींनी संसदेतच “जय महाराष्ट्र”चा नारा दिल्याने भाजपसह निशिकांत दुबेंनाही झटका बसला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी या तिघींसोबत उभं न राहिल्याने काही मराठीप्रेमींमध्ये नाराजी असून त्याची सोशल मीडियावरही चर्चा सुरू आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मात्र या तिघींचं खुलेआम अभिनंदन करत म्हटलं, “मराठी अस्मिता दाबण्याचा प्रयत्न काँग्रेस खपवून घेणार नाही. या भगिनींनी दिल्लीत मराठीचा झेंडा फडकवला आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण घडवला.”
सध्या राज्यभर या तिघी महिला खासदारांच्या निर्धाराचं आणि धाडसाचं सर्वत्र कौतुक होत असून, मराठी अस्मितेसाठी संसदेत उभं राहणाऱ्या या रणरागिणींचा गौरव लवकरच महाराष्ट्रभर होणार आहे.