X: @therajkaran
मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील सर्व प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांची आढावा बैठक घेतली. गृहनिर्माण विभागाच्या विविध विषयासंदर्भात तसेच PMAY योजनेच्या अंमलबजावणीबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे ही बैठक झाली.
मुंबईतील ‘म्हाडा’च्या मालकीच्या जागेवर असलेल्या 27 पोलीस वसाहतींचा विकास म्हाडामार्फत करावा, तसेच सायन – कोळीवाडा येथील 1200 सदनिकांचा पुनर्विकास म्हाडामार्फत करण्याचे निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.
मुंबईतील गिरणी कामगारांना हक्काची घरे मिळण्यासाठीचा प्रस्ताव आगामी काळात मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात येईल. या व्यतिरिक्त संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी व अतिक्रमित झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनासाठी म्हाडा व नगरविकास विभागाने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश दिले. या बैठकीमध्ये मुंबईतील सर्व प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्यावी, असे आदेश अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी मंत्री अतुल सावे, मंत्री मंगल प्रभात लोढा व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Also Read: प्रकाश आंबेडकरांच्या फॉर्म्युल्याने आघाडीचे नेते संकटात