मुंबई: सातारा–कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीबाबत गंभीर दखल घेत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित विभागांना तातडीने ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.
या महामार्गावरील रस्त्यांची स्थिती, कराड परिसरातील वाढती वाहतूक कोंडी तसेच साखर हंगामामुळे वाढलेली ऊस वाहतूक या पार्श्वभूमीवर आज सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत मंत्री भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तत्काळ आणि प्रभावी उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले.
सध्या या महामार्गालगत सुमारे आठ साखर कारखाने कार्यरत असून त्यांच्या ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून काही ठिकाणी अपघात, वाहन पलटी होणे, तसेच तासन्तास वाहतूक ठप्प राहण्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री भोसले यांनी महामार्गावर ठराविक अंतरावर क्रेन उपलब्ध ठेवण्याचे निर्देश दिले, जेणेकरून अपघात झाल्यास तत्काळ मदत मिळून वाहतूक सुरळीत होईल.
तसेच महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवरील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याचे आणि प्रलंबित पुलांच्या कामांबाबत ठेकेदारांना त्वरित आदेश देण्याचे निर्देश देण्यात आले. वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग खुला राहावा आणि नागरिकांना गैरसोय होऊ नये, यावर त्यांनी विशेष भर दिला.
मंत्री भोसले म्हणाले की, “जनतेला वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम करावे. महामार्गावरील सर्व्हिस रोड, दिशादर्शक फलक, प्रकाशयोजना आणि सुरक्षा व्यवस्था यामध्ये आवश्यक सुधारणा करणे हे आपले प्राधान्य आहे.”
या बैठकीस आमदार मनोज घोरपडे, सचिव (बांधकामे) आबासाहेब नागरगोजे, उपसचिव सचिन चिवटे, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तसेच दोन्ही जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

