Twitter : @therajkaran
नागपूर
महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या (Winter session) पहिल्याच दिवशी आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांच्या पोशाखाने सर्वांचे लक्ष वेधले. एकीकडे विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन सुरू असताना दुसरीकडे धंगेकरांनी पुणे स्टाइलने सत्ताधाऱ्यांविरोधातील आपला आक्षेप नोंदवला.
यावेळी धंगेकर चक्क डॉक्टरांच्या वेशात आले होते. त्यांच्या अॅप्रनवर विविध संदेश लिहिण्यात आले होते. यातील एक मुद्दा ललित पाटील प्रकरणावर होता. ललित पाटील प्रकरण (Lalit Patil) उघड झाल्यानंतर पुण्यात वाढणारं ड्रग्सचं जाळं हा गंभीर विषय समोर उभा आला. यावरुन धंगेकरांनी वारंवार राज्य सरकारकडे पावलं उचलण्याची मागणी केली आहे. आज विधानसभेच्या पहिल्या दिवशी त्यांनी या विषयाकडे लक्ष देण्याची वेगळ्या पद्धतीने मागणी केल्याचं पाहायला मिळालं. धंगेकरांच्या अॅप्ररनवर ललित पाटीलला संरक्षण देणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई करा, अशा आशयाचा संदेश लिहिण्यात आला होता. याशिवाय त्यांनी हातात स्टेथोस्कोपही घेतला होता.
काय म्हणाले रवींद्र धंगेकर?
गेल्या अधिवेशनातही राज्यात वाढणाऱ्या ड्रग्स प्रकरणावर भाषण केलं होतं. ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर राज्यभरात ड्रग्सच्या जाळं पसरल्याचं उघडकीस आलं. यात डॉक्टर आणि पोलिसांनीही मदत केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील आरोपी ससूनचे माजी डीन संजय ठाकूर यांच्याविरोधात कारवाई झालेली नाही. त्यांना संरक्षण देणं ही सरकारची चूक आहे.