मुंबई : मराठीच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायमच आक्रमक भूमिका घेत असल्याचं पाहायला मिळतं. दुकानांवरील मराठी भाषेतील पाट्या असो वा मराठी तरुणांसाठी रोजगार… राज ठाकरे वेळोवेळी यासाठी आग्रही राहिले आहेत. आता मनसेने पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्याला हात घातला आहे.
मनसे नेते नितीन सरदेसाई यांचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी समोर आला होता. यामध्ये रेल्वे गाड्यांमध्ये मिळणाऱ्या सरसकट इंग्रजी वृत्तपत्रांवरुन सवाल उपस्थित करण्यात आला होता. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये इंग्रजी वृत्तपत्र असते पण मराठी वृत्तपत्र नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेने याचा पाठपुरावा सुरू केला.
रेल्वे प्रशासनाने याची त्वरीत दखल घेतली असून महाराष्ट्रातील रेल्वे गाड्यांमध्ये मराठी वृत्तपत्र उपलब्ध केली जातील असं ठरवलं आहे. महाराष्ट्रातील रेल्वे गाड्यांमध्ये मराठी वृत्तपत्र उपलब्ध करून द्या, महाराष्ट्रात असं सांगावं लागणं, त्यासाठी पाठपुरावा करावा लागणं दुर्दैवी आहे. पण समाज, नेता जागृत असेल तर काय घडू शकतं ह्याचं हे उत्तम उदाहरण आहे, असाही टोला त्यांनी यावेळी लगावला.