Twitter : @therajkaran
मुंबई
वांद्रे कुर्ला संकुलातील ‘जिओ वर्ल्ड प्लाझा’ या पंचतारांकित मॉलमधील विविध आंतरराष्ट्रीय ब्रँड्सच्या दुकानांच्या पाट्या मराठीत (Marathi name plate to shops) आहेत का; हे तपासून बघण्यासाठी आज अखिल चित्रे (MNS leader Akhil Chitre) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) सैनिकांनी या मॉलचा पाहणी दौरा केला. मॉलमधील निम्म्या दुकानांच्या पाट्या मराठीत होत्या, तर निम्म्या दुकानांच्या पाट्या फक्त इंग्रजीत होत्या. म्हणून, दोन दिवसांच्या आत सर्व दुकानांच्या पाट्या मराठीत कराव्यात ही मागणी ‘जिओ वर्ल्ड’चे व्यवस्थापक (सिनिअर मॅनेजर, प्रॉपर्टी) विवेक जोशी यांच्याकडे केली.
ही पाहणी केल्यावर चित्रे म्हणाले, सर्वात गंभीर बाब म्हणजे, मॉलच्या मुख्य इमारतीवर आणि आतमध्येही अनेक ठिकाणी ‘Jio World Plaza’ असं फक्त इंग्रजीतच लिहिलेलं आहे. इंग्रजी नावासोबत मराठी भाषेत ‘जिओ वर्ल्ड प्लाझा’ लिहावंच लागेल, अशी समज जोशी यांना दिली. याबाबत दोन दिवसात सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, असं आश्वासन जोशी यांनी दिल्याचे अखिल चित्रे यांनी सांगितले.
अदाणी असो की अंबानी की सामान्य दुकानदार; महाराष्ट्रातील सर्व दुकानांच्या पाट्या मराठीत लागायलाच हव्यात. सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) निर्णय सर्वांना बंधनकारक आहे. या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्यांना ‘कडक समज’ दिल्याशिवाय महाराष्ट्र सैनिक स्वस्थ बसणार नाहीत, असा इशाराही अखिल चित्रे यांनी दिला आहे.