Twitter : @NalavadeAnant
मुंबई
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलण्याची भाषा आरएसएस (RSS) व भाजपामधून (BJP) सातत्याने केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आर्थिक सल्लागार बिबेक देबरॉय (Economic Advisor Bibek Debroy) यांनी एका लेखात संविधान बदलण्याची भाषा केली आहे. बिबेक देबरॉय यांच्याप्रमाणेच भाजपच्या कृपेने राज्यसभा खासदार झालेले निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई (BJP RS Member Ranjan Gogoi) यांनीही संविधानाचा मूळ ढांचा बदलण्याची गरज व्यक्त केली आहे. या दोघांच्या विधानाशी भाजपा व नरेंद्र मोदी सहमत आहेत का? याचा पंतप्रधानांनी तात्काळ खुलासा करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (MPCC President Nana Patole) यांनी गुरुवारी येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना केली.
पटोले यांनी संविधान बदलाची भाषा करणाऱ्यांचा खरपूर समाचारही घेतला. ते पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांनी जगातील सर्वात श्रेष्ठ संविधान देशाला दिले आहे. या संविधानाने वंचित, मागास, दलित, अल्पसंख्याक घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. समाजातील सर्वात शेवटच्या पंक्तीतील नागरिकांना न्याय मिळेल याची तरतूद केली. सर्वांना समान हक्क, अधिकार व न्याय दिला. परंतु संविधान न माननारे काही लोक आपल्या देशात आहेत. ज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्यांच्या परिवारातील संघटना सातत्याने संविधान बदलाची मागणी करत असतात. भाजपाच्या जे मनात आहे तेच आज पुन्हा एकदा बाहेर आले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना इंग्रजांच्या विचारांचे असे म्हणून त्यांचा अपमान करण्याचे कामही करण्यात आले. या सर्वांवर खुलासा होणे गरजेचे असून बिबेक देबरॉय व रंजन गोगई यांचे राजीनामे पंतप्रधानांनी घेतले पाहिजेत, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.