Nitesh Karale Joins Pawar’s NCP : स्पर्धा परीक्षा, एमपीएससी विद्यार्थ्यांना धडे देणारे नितेश कराळे यांनी आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा सुरू होती. विशेष म्हणजे ते लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहे.
उद्या ३० मार्च रोजी शरद पवार गटाची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यात आज नितेश कराळे यांनी पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांना लोकसभेसाठी संधी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याशिवाय शरद पवार यांच्या उपस्थितीत आर्वीचे माजी आमदार अमर काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
https://www.facebook.com/share/p/7KyrqaSK8Kp174aa/?mibextid=WC7FNe
काही दिवसांपूर्वी नितेश कराळे यांनी शरद पवार आणि जयंत पाटील यांची पुण्यात भेट घेतली होती. शरद पवार आणि जयंत पाटील यांचा आशीर्वाद असल्यास मी वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे कराळे गुरुजी म्हणाले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रसिद्ध असलेले कराळे मास्तर निवडणुकीच्या रिंगणात दिसणार का हे येत्या काही तासात समोर येईल.
कोण आहेत नितेश कराळे?
नितेश कराळे फिनिक्स अकॅडमीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. त्यांचं स्वत:च युट्यूब चॅनलही आहे. याच्या माध्यमातून ते स्पर्धा परीक्षेचे धडे देतात. नितेश कराळे यांची संवाद शैली विद्यार्थ्यांमध्ये प्रसिद्ध आहे. त्यांच्या वऱ्हाडी बोलीत शिकवण्याच्या कलेमुळे ते वेगळे ठरतात.