मुंबई- महाविकास आघाडीशी जागावाटपामुळे सहमती होऊ न शकलेले प्रकाश आंबेडकर आता तिसरी आघाडी करण्याच्या प्रयत्नानत आहेत. भाजपाला रोखण्यासाठी त्यांनी काही पक्षांशी आणि संघटनांशी चर्चा केली असून येत्या २ एप्रिलला याची घोषणा करण्यात येईल. अशी माहिती देण्यात आलीय. यात मनोज जरांगे, केशव अण्णा धोंडगे यांच्यासारखी काही नावं असण्याची शक्यता आहे.
मनोज जरांगेंशी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा
काही दिवसांपूर्वीच आंबेडकरांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. यावेळी मराठा समाजाच्या वतीनं जे उमेदवार उभे करण्यात येतील, त्यांना सोबत घेऊन पाठिंबा देण्याचा आंबेडकर यांचा प्रयत्न आहे. दुसरीकडे धनगर, ओबीसी समाजातील काही नेत्यांनाही सोबत घेण्याचा प्रयत्न आंबेडकर यांच्याकडून करण्यात येतोय. पुण्यात मनसेतून बाहेर पडलेले नेते वसंत मोरे य़ांनीही आंबेडकरांची भेट घेतलीय. त्यांनाही वंचितच्या तिकिटावर उभा करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे.
महायुतीला मदत होणार का?
मविआत काही जागांवरुन ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाद आहेत. त्या ठिकाणी आता मैत्रीपूर्ण लढती होणार असल्याचं सांगण्यात येतंय. तर राजू शेट्टींप्रमाणेच काही मतदारसंघांमध्ये राजकीयदृष्ट्या बलवान असणारे नेते मैदानात उतरलेले दिसतायेत. अशात वंचितनं आणखी एक उमेदवार आघाडीत उभा केल्यास मतविभाजन होण्याची शक्यता आहे. याचा फटका मविआला बसेल आणि महायुतीला याची मदत होईल, असं सांगण्यात येतंय.