मुंबई: रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या प्रकल्प अंतर्गत संपूर्ण मुंबई महानगरातील विविध रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण नियोजित कालावधीत पूर्ण होत आहे. पावसाळापूर्व नियोजनानुसार, खोदकाम केलेल्या एकूण १३८५ रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. दिनांक २ जून २०२५ पर्यंत काँक्रिट क्यूरिंग पूर्ण होत असून दिनांक ५ जून २०२५ पर्यंत रस्त्यावरील सर्व रस्तारोधक (Barricades) हटविले जातील व रस्ते वाहतुकीस खुले होतील, याचे पालन करावे, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले.
मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्प अंतर्गत, पूर्व उपनगरात पूर्णत्वास येत असलेल्या रस्ते कामांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त बांगर यांनी काल (दिनांक २८ मे २०२५) रात्री ठिकठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. चेंबूर येथे संत कक्कया मार्ग, साकीविहार रस्ता, घाटकोपर (पश्चिम) येथील सिकोवा औद्योगिक मार्ग, भांडूप (पश्चिम) येथील सुभाष नगर मार्ग, विक्रोळी (पश्चिम) येथील सूर्या नगर मार्ग, मुलुंड (पश्चिम) येथील मॅरेथॉन गॅलेक्सी मार्ग आणि बाबा पदमसिंह छेद मार्ग क्रमांक ५ आदींचा त्यात समावेश होता.
रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्प अंतर्गत, टप्पा एक आणि टप्पा दोन मिळून एकूण १३८५ रस्ते कामे हाती घेण्यात आली आहेत. या सर्व रस्त्यांवर पेव्हमेंट क्वॉलिटी काँक्रिट (PQC) (काँक्रिट ओतणे) रस्ते कामे पूर्ण झाली आहेत. पैकी, ३० रस्त्यांचा अंशतः भाग मास्टिक अस्फाल्टद्वारे पूर्ण करण्यात येत आहे. बहुतांशी रस्ते ‘एण्ड टू एण्ड’ तर काही रस्ते ‘जंक्शन टू जंक्शन’ पूर्ण झाले आहेत. उर्वरित कामे पावसाळ्यानंतर घेतली जाणार आहेत. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. बांगर यांनी या रस्ते काँक्रिट कामांचा आज (दिनांक २९ मे २०२५) महानगरपालिका मुख्यालयात आढावा घेतला.
श्री. बांगर म्हणाले की, या हंगामात हाती घेण्यात आलेली रस्ते काँक्रिटीकरणाची नियोजित कामे पूर्णत्वास येत आहेत. काँक्रिट ओतण्याची कामे दिनांक २० मे २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता. मात्र, मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने ही मुदत दिनांक २३ मे २०२५ पर्यंत वाढविण्यात आली होती. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली आहे. ‘पीक्यूसी’ची कामे पूर्ण झाल्यामुळे आता रस्ते बांधणीतील अखेरची कामे (Finishing Work) प्रगतिपथावर आहेत. पावसाची उघडीप मिळताच रस्ते बांधणीतील अखेरची कामे जसे की, थर्मोप्लास्ट, कॅट आईज, दिशादर्शक फलक, वाहतूक सुरक्षा चिन्हे, जंक्शन ग्रीड आदी कामे दिनांक ५ जून २०२५ पर्यंत पूर्ण केली जातील. वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून ही कामे रात्रीच्यावेळी करावीत. रस्तारोधक हटवावेत, असे निर्देश श्री. बांगर यांनी दिले आहेत.
रस्ते कामाचा राडारोडा, बांधकाम साहित्य हे रस्त्यांचा कडेला पडून राहू नये. ते विनाविलंब उचलावे, असे निर्देश देताना श्री. बांगर म्हणाले की, मान्सूनचे आगमन लवकर झाले आहे. या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील राडारोडा, उर्वरित बांधकाम साहित्याची विल्हेवाट लावण्यासाठी रस्तानिहाय नियोजन करावे, त्यासाठी समर्पित गट तयार करुन आवश्यकतेनुसार अधिकचे मनुष्यबळ नेमावे. येत्या दोन-तीन दिवसांत राडारोडा हटविण्याची कार्यवाही पूर्ण होईल, हे सुनिश्चित करावे, अशी सूचना श्री. बांगर यांनी केली.
मान्सूनचे आगमन तसेच दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर पर्जन्य जलवाहिन्या स्वच्छ करण्यात आल्या आहेत का, याची काळजीपूर्वक तपासणी करावी. पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये पाणी टाकून कोठे अवरोध नाही ना याची खातरजमा करावी. पूर्ण झालेले रस्ते जंक्शनला जोडताना मास्टिक अस्फाल्टद्वारे जंक्शनचा भाग समतल राहिल, हे सुनिश्चित करावे. विभाग कार्यालयांकडून रस्त्यांवरील अधिकृत गतिरोधकांची यादी प्राप्त करावी व गतिरोधकांची पुनर्बांधणी (Restore) करावी, असे निर्देश देखील बांगर यांनी दिले.
परिमंडळनिहाय पीक्यूसी पूर्ण झालेल्या रस्त्यांची माहिती पुढीलप्रमाणे (एकूण १,३८५)-
परिमंडळ १ – ८४ रस्ते; परिमंडळ २ – ५८ रस्ते; परिमंडळ ३ – २४२ रस्ते; परिमंडळ ४ – ३७७ रस्ते;
परिमंडळ ५ – १९२ रस्ते; परिमंडळ ६ – ९८ रस्ते; परिमंडळ ७ – ३३४ रस्ते.