मुंबई: 2024-25 या आर्थिक वर्षात महाराष्ट्राने परकीय गुंतवणुकीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. राज्यात एकूण 1,64,875 कोटी रुपयांची परकीय थेट गुंतवणूक (FDI) आली असून, ही देशात झालेल्या एकूण गुंतवणुकीच्या 40 टक्के इतकी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही गुंतवणूक 32 टक्क्यांनी वाढलेली आहे. ही आकडेवारी 2024-25 या वर्षाच्या अंतिम तिमाहीची (जानेवारी ते मार्च 2025) असून ती केंद्र सरकारने जाहीर केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विक्रमी यशाबद्दल राज्यातील जनतेचे अभिनंदन करताना सांगितले की, “या आर्थिक वर्षात महाराष्ट्राने गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक गुंतवणूक आकर्षित केली आहे. विशेष म्हणजे, फक्त पहिल्या 9 महिन्यांतच आपण जुने विक्रम मोडून काढले होते.”
राज्याच्या या यशात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे नेतृत्व महत्त्वाचे ठरल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.
ताज्या आकडेवारीनुसार:
• देशात 2024-25 मध्ये एकूण परकीय गुंतवणूक: 4,21,929 कोटी रुपये
• त्यापैकी महाराष्ट्रातील गुंतवणूक: 1,64,875 कोटी रुपये
• शेवटच्या तिमाहीतील गुंतवणूक (जानेवारी ते मार्च 2025): 25,441 कोटी रुपये
मागील वर्षांतील परकीय गुंतवणुकीची आकडेवारी (कोटी रुपयांमध्ये):
• 2015-16: 61,482
• 2016-17: 1,31,980
• 2017-18: 86,244
• 2018-19: 57,139
• एप्रिल-ऑक्टोबर 2019: 25,316
• 2020-21: 1,19,734
• 2021-22: 1,14,964
• 2022-23: 1,18,422
• 2023-24: 1,25,101
• 2024-25: 1,64,875 (रिकॉर्डब्रेक)
मुख्यमंत्री फडणवीस यांनी विश्वास व्यक्त केला की, “ही गुंतवणूक महाराष्ट्रात रोजगारनिर्मितीला चालना देईल आणि राज्याच्या सर्वांगीण विकासात मोठा वाटा उचलेल.”