मुंबई: उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गटाला २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील पराभव चटकून बसला असून, त्यानंतर पक्षातील प्रवक्त्यांनी प्रसारमाध्यमांमध्ये रडारड सुरू केली आहे, असा आरोप भाजपचे मुंबईचे मुख्य प्रवक्ते निरंजन शेट्टी यांनी केला आहे.
“उद्धव बाळासाहेब ठाकरे (उ.बा.ठा.) पक्ष संपुष्टात येण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे यांनी आपल्या प्रवक्त्यांना ‘मोले घातले रडायला’ अशी स्थिती निर्माण केली आहे,” असा टोला शेट्टी यांनी लगावला. संजय राऊत, सुषमा अंधारे, किशोरी पेडणेकर आणि हर्षल प्रधान यांच्यावर टीका करताना शेट्टी म्हणाले की, “हे सर्व लोक मीडियासमोर रडत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसते.”
नुकत्याच ‘लोकसत्ता’ दैनिकामध्ये हर्षल प्रधान यांनी लिहिलेल्या ‘एकनाथ भाई, तुमची आश्वासने पूर्ण होतील?’ या शीर्षकाच्या लेखावरही शेट्टींनी जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, “हा लेख म्हणजे ‘बोलाची कढी आणि बोलाचा भात’ असून, महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष विचलित करण्याचा एक अपयशी प्रयत्न आहे.”
“महायुती सरकार बदनाम करण्याचा प्रयत्न या लेखातून केला गेला आहे. पण, जनतेने महाविकास आघाडीच्या काळात झालेला भ्रष्टाचार अनुभवला आहे, त्यामुळे हा प्रयत्न पूर्णतः फोल ठरतो,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
शेट्टी पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी राज्यभर ‘ऑपरेशन शिकार ए कागदी वाघ’ अंतर्गत ठाकरे गटातल्या अनेक नेत्यांना पुन्हा मूळ शिवसेनेत सामावून घेतले असून, दापोलीत नुकतेच ठाकरे गटाचे नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे ठाकरे गटाची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत चालली आहे.
“लवकरच ठाकरे गटात आदित्य ठाकरे, अनिल परब, अंबादास दानवे, अरविंद सावंत, सुनिल प्रभू आणि राऊत बंधू – एवढीच ‘नवरत्नं’ उरतील,” असा उपरोधिक टोलाही शेट्टी यांनी लगावला.
एकनाथ शिंदे यांचे नाव घेऊन आता ‘भाई’ म्हणण्यामागे ठाकरे गटाची घबराट स्पष्ट होते, असे शेट्टी म्हणाले. “पूर्वी ज्यांना ‘गद्दार’, ‘मिंधे’ म्हटले जात होते, त्यांनाच आता ‘भाई’ म्हणावे लागते, यावरून उ.बा.ठा. गटाच्या मानसिक स्थितीचा अंदाज येतो,” अशी टिपणी त्यांनी केली.
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत होणाऱ्या संभाव्य पराभवाच्या भीतीने ही रडारड सुरू झाली असल्याचा आरोप करत, शेट्टी यांनी ठाकरे गटाच्या प्रचाराला ‘खोटा प्रचार’ अशी उपाधी दिली.