By देवेंद्र भुजबळ
एकीकडे आजही हुंडाबळीनी समाजात प्रचंड संताप, अस्वस्थतेची भावना निर्माण होत असताना काही बाबी मात्र
दिलासा देऊन जातात. पतीने पत्नीला योग्य साथ दिली तर ती तिच्या जीवनात कशी प्रगती करू शकते याचे उदाहरण नुकतेच नवी मुंबईत पहावयास मिळाले.
नवी मुंबईतील लेखिका, कवयित्री सौ. वर्षा महेंद्र भाबल यांचे गावी दहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर पुढे शिकण्याची इच्छा होती. पण परिस्थितीमुळे शिक्षण घेऊन न शकलेली ही कोकणकन्या मुंबईत आली आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एम टी एन एल – पूर्वीचे बॉम्बे टेलिफोन्स) मध्ये कामाला लागली. पुढे यथावकाश जिद्दीने केलेला प्रेम विवाह, मुलेबाळे यात आपोआप शिक्षण मागे पडत गेले. पण शिकण्याची इच्छा मनात घर करून होतीच.
तसा सौ. वर्षा महेंद्र भाबल यांनी २०१२ साली यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठात प्रवेश घेतला होता. पण पुन्हा घरगुती अडचणी येत गेल्या आणि येरे माझ्या मागल्या सुरू होऊन तो प्रयत्न असफल ठरला. पण जेव्हा त्यांनी एमटीएनएल मधून २०२० मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली तेव्हा मात्र मनाचा निर्धार करून पुन्हा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठात प्रवेश घेतला आणि येत राहिलेल्या साऱ्या अडचणीवर मात करीत एकेक वर्ष यशस्वीरीत्या पूर्ण केले.
याचेच फळ म्हणून नुकत्याच लागलेल्या निकालानुसार त्यांनी ६२ व्या वर्षी कला शाखेत पदवी मिळविली आहे. त्यांच्या या प्रयत्नांना पती, दोन्ही मुली आणि जावई यांनीही योग्य ती साथ दिली.
विशेष म्हणजे त्यांचे हे यश त्यांना सतत साथ देत आलेले पती, क्रिकेटपटू श्री महेंद्र भाबल यांनी फेसबुक पोस्टद्वारे स्वतः जाहीर करून आनंद व्यक्त केला आहे.
सौ. वर्षा महेंद्र भाबल यांनी त्यांचे “जीवनप्रवास” हे अत्यंत प्रेरणादायी आत्मकथन लेखमालेच्या स्वरूपात प्रथम न्यूज स्टोरी टुडे पोर्टल वर प्रसिद्ध केले. नंतर हेच आत्मकथन “जीवनप्रवास” या
नावानेच पुस्तक रूपात प्रकाशित झाले आहे.
आपण निवृत्त झालो, म्हणजे आता आयुष्यात करण्यासारखे काही नाही, असा ग्रह अनेक स्त्री पुरुष करून घेतात. अशा व्यक्तींनी आदर्श घ्यावा, असेच सौ. वर्षा महेंद्र भाबल यांचे यश आहे. आता त्यांनी इथेच न थांबता एम ए करावे, यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा.
लेखक :देवेंद्र भुजबळ
9869484800
(लेखक देवेंद्र भुजबळ हे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे निवृत्त संचालक आहेत. त्यांच्याशी 9869484800 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.)