महाडजवळील केंबुर्ली येथे घटना; निकृष्ट कामांवर प्रश्नचिन्ह, महामार्ग विभागाच्या निष्क्रियतेवर संताप
महाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कामांच्या गुणवत्तेवर पहिल्याच पावसाने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. महाड तालुक्यातील केंबुर्ली गाव हद्दीतील एका वळणावर सोमवारी सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास अचानक दरड कोसळून ती मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका चालत्या ईर्टिगा कारवर आदळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र महामार्गावरील कामांच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
महाड तालुक्यात दिवसभर जोरदार पाऊस सुरू होता. त्यानंतर सायंकाळी केंबुर्ली गावाजवळील उंच कड्यावरून अचानक दरड कोसळली. मोठमोठे दगड थेट महामार्गावर येऊन पडले. त्याचवेळी अनेक वाहने या मार्गावरून प्रवास करत होती. काही वाहने वेळेत थांबली, तर काही पुढे निघून गेली. मात्र या दरडीच्या तडाख्यात एक ईर्टिगा कार सापडली. दरडीतील एक मोठा दगड कारवर आदळल्याने वाहनाचे नुकसान झाले.
कार चालकाच्या प्रसंगावधानामुळे आणि दैव बलवत्तर असल्याने वाहनातील प्रवाशांचा जीव वाचला. घटनेनंतर महामार्गावर मोठमोठे दगड पडून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.
महामार्ग पोलिसांची तत्परता; महामार्ग विभाग मात्र गायब
घटना घडली त्यावेळी महाडच्या दिशेने जाणारे बेलापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी त्या मार्गावरून प्रवास करत होते. त्यांनी तत्काळ वाहन थांबवून रस्त्यावर पडलेले दगड हटविण्याचे काम सुरू केले.
त्यानंतर महामार्ग वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद माळवे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर ढाकणे, पोलीस उपनिरीक्षक जयसिंग पवार तसेच पोलीस शिपाई अमर भोसले आणि दयानंद शेळके यांनी घटनास्थळी धाव घेत महामार्गावरील दगड हटवून वाहतूक सुरळीत केली.
मात्र एवढी गंभीर घटना घडूनही राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी किंवा संबंधित कंत्राटदार कंपनीचे प्रतिनिधी घटनास्थळी दिसून न आल्याने वाहनचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
तीन ठिकाणे धोक्याच्या छायेत
स्थानिकांच्या मते, केंबुर्ली गाव हद्दीतील वळण, दासगाव खिंड आणि महाड शहरालगतच्या नागलवाडी गावाजवळील वळण ही तीन ठिकाणे सध्या अत्यंत धोकादायक बनली आहेत. पावसाळ्यात या भागात दरड कोसळण्याचा धोका कायम असून प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

“क्षणात मृत्यू समोर दिसला”
“मी माझ्या वाहनातून मुंबईच्या दिशेने जात होतो. अचानक मोठमोठे दगड आवाज करत महामार्गावर कोसळले. त्यातील एक दगड माझ्या कारवर येऊन आदळला. सुदैवाने आम्ही बचावलो,” अशी माहिती ईर्टिगा कारचे मालक मुदस्सीर परकार यांनी दिली.
एकंदरीत, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कामांच्या गुणवत्तेची पोलखोल पहिल्याच पावसात झाली असून आगामी चार महिन्यांच्या पावसाळ्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासन आणि महामार्ग विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

