महाड: मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर सुरू असलेल्या ओव्हरलोड कोळसा वाहतुकीमुळे वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर दक्षिण रायगड जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वाहतूक सेनेने प्रशासनाला कठोर इशारा दिला आहे. येत्या आठ दिवसांत ओव्हरलोड कोळसा वाहतूक बंद न झाल्यास चक्काजाम आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वाहतूक सेनेचे अध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिला.
या संदर्भात सुभाष मोरे यांनी पेण येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी माधव सूर्यवंशी यांची भेट घेतली आणि त्यांना लेखी निवेदन सादर केले.
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर ओव्हरलोड कोळसा वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असून त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांच्या अपघातांच्या घटना सातत्याने घडत आहेत. या अपघातांत अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. तरीदेखील अवैधपणे ओव्हरलोड कोळसा वाहतूक सुरूच असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत प्रशासनाने तातडीने कारवाई करून ओव्हरलोड कोळसा वाहतूक बंद करावी, अन्यथा येत्या आठ दिवसांत कारवाई न झाल्यास महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा वाहतूक सेनेचे अध्यक्ष सुभाष मोरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

