By दिपक कैतके
मुंबई: “कोंबडीला खुराड्यात कोंडावे, तशी आमची अवस्था झाली होती,” अशा संतप्त शब्दांत प्रवाशांनी आज मुंबई मेट्रो-३ (आक्वा लाईन) मधील अनुभव मांडला. धारावी स्थानकावरून दुपारी सुमारे १२.४५ वाजता सुरू झालेला प्रवास चर्चगेट (मंत्रालय) परिसरापर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल दोन तास लागल्याने प्रवाशांचा संयम अखेर संपल्याचे चित्र पाहायला मिळाले. यातील सुमारे दीड तास मेट्रो भुयारी बोगद्यातच ठप्प उभी होती.
भुयारी मार्गावर मोबाईल नेटवर्क नसल्याने शेकडो प्रवासी बाह्य जगापासून पूर्णपणे तुटले होते. काय घडले आहे, सेवा कधी सुरू होणार, पर्यायी व्यवस्था काय आहे याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती न मिळाल्याने प्रवाशांमध्ये भीती, अस्वस्थता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेकांनी मेट्रोतील वातावरण “कोंदट” आणि “श्वास गुदमरवणारे” असल्याची तक्रार केली.
प्रवाशांच्या मते, तांत्रिक बिघाडानंतर परिस्थिती हाताळण्यात मेट्रो प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले. मदत किंवा संवाद साधण्याऐवजी काही कर्मचारी प्रवाशांशी उद्धटपणे वागत असल्याचाही आरोप करण्यात आला. विशेष म्हणजे, मेट्रोच्या वायरलेस यंत्रणेतून वारंवार “कोणी मीडियाचा माणूस आहे का?” किंवा “कोणी व्हिडिओ काढत आहे का?” अशी विचारणा होत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेपेक्षा प्रशासनाला प्रतिमा सांभाळण्याची अधिक चिंता असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
या घटनेत दिव्यांग प्रवाशांनाही मोठा त्रास सहन करावा लागल्याचे समोर आले. झीशान नावाच्या एका दिव्यांग प्रवाशाने ऑनलाईन तिकीट काढूनही त्याला आवश्यक मदत मिळाली नाही. उलट एका महिला कर्मचाऱ्याने उद्धट वागणूक दिल्याचा आरोप त्याने केला. “सामान्य प्रवाशांची अशी अवस्था असेल तर रुग्ण, ज्येष्ठ नागरिक किंवा लहान मुलांसह प्रवास करणाऱ्यांचे काय?” असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
तांत्रिक बिघाडामुळे सेवा विस्कळीत झाल्यानंतरही ऑनलाईन तिकीटधारकांना परतावा नाकारण्यात आल्याने प्रवाशांचा संताप आणखी वाढला. “फक्त फिजिकल तिकीट असेल तरच रिफंड मिळेल,” अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतल्याचा आरोप प्रवाशांनी केला. त्यामुळे आर्थिक फटका आणि मानसिक त्रास अशा दुहेरी संकटाला सामोरे जावे लागल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरू झालेल्या मेट्रो-३ मार्गावर यापूर्वीही तांत्रिक अडचणी समोर आल्या आहेत. मागील पावसाळ्यात वरळी स्थानकात पाणी शिरल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता भुयारी मार्गातील दीर्घकाळ ठप्प सेवा पाहता, मुंबईकरांच्या सुरक्षिततेबाबत आणि आपत्कालीन व्यवस्थापनाबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत.
बस किंवा लोकल रेल्वे बंद पडल्यास प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध असतो. मात्र, मेट्रो-३च्या बंदिस्त भुयारी बोगद्यात अडकणे म्हणजे प्रवाशांसाठी एक प्रकारचे “डिजिटल जेल” ठरत असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली. माहितीचा अभाव, नेटवर्क नसणे आणि संवादाचा पूर्ण अभाव यामुळे आजची घटना केवळ तांत्रिक बिघाडापुरती मर्यादित न राहता, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील उत्तरदायित्व आणि आपत्कालीन तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.


Veola Balwin
May 22, 2026Some genuinely nice and useful info on this web site, besides I think the design has got superb features.