मुंबई – अवघ्या एका पावसात मुंबई पुन्हा एकदा जलमय झाली असून, मेट्रोच्या भुयारी मार्गात पाणी शिरल्याने या प्रकल्पात झालेल्या भ्रष्टाचाराचे लक्षण समोर आले आहे, असा गंभीर आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, “मुंबई महानगरपालिकेवर गेली तीन वर्षे भाजप आणि मिंधे टोळीचा कब्जा आहे. या काळात जनतेच्या पैशांची लूट झाली. त्याचा आम्ही नक्कीच समाचार घेऊ.”
पण सध्या निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शिवसैनिकांना रस्त्यावर उतरून नागरिकांना मदतीचा हात देण्याचे आवाहन केले आहे.
“आज माझं माझ्या शिवसैनिकांना स्पष्ट आवाहन आहे – रस्त्यावर उतरा आणि लोकांच्या मदतीला धावा. हीच खरी शिवसेना!” असे ते म्हणाले.
मुंबईतील अतिवृष्टीमुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. मेट्रोच्या बोगद्यांमध्ये पाणी शिरल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्न निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे आता मुंबईच्या पावसाळी तयारीवर आणि महापालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.