मुंबई– अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे हुकूमशाही प्रवृत्तीचे असून त्यांच्या कार्यपद्धतीत रशियाचे व्लादिमीर पुतिन आणि उत्तर कोरियाचे किम जोंग उन यांची छाया दिसते, असा आरोप अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाचे दोन वेळा निवडून आलेले भारतीय वंशाचे खासदार श्री. ठाणेदार यांनी आज येथे केला.
मुंबई मराठी पत्रकार संघ आयोजित ‘ऑपरेशन सिंदूर आणि अमेरिका-भारत संबंध’ या विषयावरील वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.
“अमेरिका हा स्थलांतरितांच्या कष्टातून उभा राहिलेला देश आहे. मात्र ट्रम्प यांच्या धोरणांचा कल केवळ गोऱ्या मतदारांच्या हितसंबंधांकडे झुकलेला आहे, जो अमेरिकेच्या आर्थिक हिताला मारक ठरतो. आम्ही अशा असंवैधानिक प्रवृत्तींविरोधात लढा देत आहोत आणि तो चालूच राहील,” असे ठणकावून त्यांनी सांगितले.
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’चे समर्थन करत ठाणेदार म्हणाले, “पाकिस्तानाविरोधात भारताने केलेला सर्जिकल स्ट्राईक हा योग्य होता. ते युद्ध नव्हे, तर दहशतवादाविरोधातील निर्णायक कारवाई होती. अमेरिकन जनता देखील दहशतवादविरोधी लढ्याला कायम पाठिंबा देते. त्यामुळे ‘ऑपरेशन सिंदूर’ हे योग्य दिशेने उचललेले पाऊल होते.”
ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या घोषणेवरही त्यांनी टीका करत, ती चूक असल्याचे म्हटले. त्यांनी स्पष्ट केले की अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध हे चीनसारख्या देशांना रोखण्यासाठी नेहमीच बळकट असावेत.
राजकीय आयुष्याबद्दल बोलताना ठाणेदार म्हणाले, “वैयक्तिक आयुष्यात अनेकदा आर्थिक अपयश आले, पण हार मानली नाही. व्यवसायात यश मिळवल्यानंतर अमेरिकन राजकारणात आलो. माझ्या मतदारसंघात साडे सात लाख लोक आहेत, अनेक गरिबीत आहेत. त्यांच्या विकासासाठी मोठा निधी आणला. माझी दोन्ही मुले नोकरी करतात, निवडणुकीचा सारा खर्च स्वतः केला. राजकारणामुळे माझी संपत्ती निम्म्यावर आली, पण जनतेची सेवा महत्त्वाची आहे.”
दहशतवादाविरोधात सर्व जगाने एकत्र येणे गरजेचे आहे, असे सांगून त्यांनी या लढ्यात भारताला पाठिंबा देण्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण होते. उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विश्वस्त राही भिडे, खजिनदार जगदीश भोवड आणि कार्यकारिणी सदस्य राजू खाडे यांची उपस्थिती होती.