मुंबई: राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकऱ्यांवर पुन्हा संकट ओढावले आहे. पंचनाम्याच्या प्रक्रियेला बाजूला सारून शेतकऱ्यांना तातडीने एकरी ₹२० हजार व हेक्टरी ₹५० हजार मदत द्यावी, अशी जोरदार मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारकडे केली आहे.
गांधी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ म्हणाले की, शेतकऱ्यांना खरिपासाठी मोफत बियाणे व खते दिली पाहिजेत. अद्याप कर्जमाफी जाहीर झालेली नाही, किमान कर्ज पुनर्गठन तरी तातडीने करावे.
त्याचबरोबर, कालवे फुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा व मुंबई तुंबल्याने शिंदे गटाचा भ्रष्टाचार उघड झाला असून, एकाच पावसाने त्यांच्या कथित विकासाच्या दाव्यांची पोलखोल केली आहे. अनेक कोटी खर्चूनही मुंबई पाण्याखाली गेली, झाडांची कत्तल करून भुयारी मेट्रो लादण्यात आली, त्याचे दुष्परिणाम समोर येत आहेत.
सपकाळ यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, महाराष्ट्रात आलेल्या संकटावर शाह यांनी एक शब्दही काढलेला नाही. प्रचारात सिलिंडर, कर्जमाफी, आणि लाडक्या बहिणीसाठी ₹२१०० देण्याची वचने दिली होती, ती विसरली गेली आहेत.
या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे मोहन जोशी व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.