नवी दिल्ली : विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाबद्दल ६८ जणांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. या यादीत महाराष्ट्रातील सहा मान्यवरांचा समावेश असून, माजी मुख्यमंत्री दिवंगत डॉ. मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण, तर अशोक सराफ, अच्युत पालव, अश्विनी भिडे-देशपांडे, सुभाष शर्मा आणि डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले.
राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या समारंभात उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक मंत्री व अधिकारी उपस्थित होते.
पद्मभूषण (मरणोत्तर) – डॉ. मनोहर जोशी
माजी मुख्यमंत्री आणि माजी लोकसभा अध्यक्ष डॉ. मनोहर जोशी यांना सार्वजनिक क्षेत्रातील योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मभूषण प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांचे सुपुत्र उन्मेश जोशी यांनी स्वीकारला. पाच दशकांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी मुंबई महापालिकेपासून ते लोकसभा अध्यक्षपदापर्यंतची जबाबदारी समर्थपणे निभावली.
पद्मश्री पुरस्कार विजेते (महाराष्ट्रातील):
• अशोक सराफ (कला): मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ विनोदी अभिनेते. ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धुमधडाका’सह अनेक चित्रपटांतून त्यांनी अमीट ठसा उमटवला आहे.
• अच्युत पालव (कला): देवनागरी लिपीच्या सौंदर्याला नवे परिमाण देणारे सुप्रसिद्ध कॅलिग्राफर. भारतासह विदेशात त्यांनी लिपीची कला प्रसारित केली आहे.
• अश्विनी भिडे-देशपांडे (संगीत): जयपूर-अतरौली घराण्याच्या आघाडीच्या गायिका. ख्याल गायकीसोबतच भजन, ठुमरी, अभंग गायनातही प्रावीण्य.
• सुभाष शर्मा (कृषी): यवतमाळचे प्रगतिशील शेतकरी. नैसर्गिक शेतीत नवे प्रयोग करून हजारो शेतकऱ्यांना प्रेरणा दिली.
• डॉ. विलास डांगरे (वैद्यकीय सेवा): होमिओपॅथी तज्ज्ञ. अंधत्व असूनही १० वर्षांपासून गरजू रुग्णांची निःस्वार्थ सेवा. त्यांनी एक लाखांहून अधिक रुग्णांवर उपचार केले आहेत.
यंदाच्या पद्म पुरस्कारांमध्ये एकूण १३९ जणांना सन्मानित करण्यात आले असून, त्यात ७ पद्मविभूषण, १९ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.