Twitter : @therajkaran
मुंबई
मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये देशभरातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. यात गरीब तसेच गरजू रुग्णांची संख्या अधिक असते. त्यामुळे पालिका रुग्णालयांमध्ये देण्यात येणाऱ्या सर्व वैद्यकीय सुविधा व औषधोपचार उपलब्ध करुन देण्यासाठी ’झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी‘ (Zero Presription policy) राबविण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल (BMC Commissioner IS Chahal) यांना दिले आहेत. त्यासाठी सविस्तर आढावा घेऊन सर्वंकष अहवाल सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिका झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी राबविणारी मुंबई महापालिका देशातली पहिली महापालिका ठरणार आहे.
ही योजना राबविण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून राबविण्यात येणाऱ्या औषधे व संसाधने खरेदी प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी नुकतीच के. ई. एम रुग्णालयाला (KEM Hospital) भेट दिली होती. त्यावेळी रुग्ण व नागरिकांशी झालेल्या चर्चेदरम्यान काही त्रुटी निदर्शनास आल्या होत्या. महानगरपालिका रुग्णालयात उपलब्घ्ध औषधे व संसाधनांव्यतिरिक्त नातेवाईकांमार्फत रुग्णांच्या उपचारासाठी खर्च केला जातो. गरीब रुग्णांवर या खर्चाचा अतिरिक्त बोजा पडतो. आरोग्य उपचारावर होणाऱ्या (Out of pocket expenses) खर्चामुळे साधारणतः १० टक्के नागरिक दारिद्रय रेषेखाली खेचले जातात. राष्ट्रीय स्तरावर विविध संस्थांनी केलेला अभ्यास व संशोधनातून निदर्शनास आल्याचे महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले. गरीब रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयांमार्फत निःशुल्क सेवा उपलब्ध व्हावी यासाठी ही पॉलिसी राबविण्याबाबत महापालिकेला निर्देश दिले आहेत. त्यासाठी सविस्तर अभ्यास करून अहवाल सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्त यांना दिले आहेत.
मनपा रुग्णालयांची स्थिती :
मुंबई महानगरपालिकेमार्फत ४ वैद्यकीय महाविद्यालय, १ दंत महाविद्यालय, १६ उपनगरीय रुग्णालये, ५ विशेष रुग्णालये, ३० प्रसूतिगृहे, १९२ दवाखाने सुरू आहेत. याखेरीज २०२ हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ’आपला दवाखाना‘ देखील कार्यरत आहेत. या वैद्यकीय व्यवस्थेतील रुग्णालयांमध्ये ७१००, उपनगरीय रुग्णालयामध्ये ४०००, विशेष रुग्णालयात ३००० व इतर अशा एकूण सुमारे १५ हजार रुग्णशय्या आहेत. यामध्ये ५० हजार पेक्षा अधिक रुग्ण दररोज बाह्य रुग्ण सेवेचा लाभ घेतात. तसेच, वार्षिक सरासरी २० लाख पेक्षा अधिक रुग्ण आंतर रुग्ण सेवेचा लाभ घेतात.