एकगठ्ठा मुस्लिम मतं ठरणार निर्णायक
X: @ajaaysaroj
मुंबई: भाजपच्या (BJP) केंद्रीय नेतृत्वाने सांगूनही आशिष शेलार (Ashish Shelar) यांचा जागा लढवण्यास नकार, पराग आळवणी (Parag Alavani) विधानसभेत असणे आवश्यक, आणि पूनम महाजन (Poonam Mahajan) यांना काहीही झाले तरी तिकीट द्यायचे नाहीच असा झालेला केंद्रीय निर्णय, या सर्व बाबी लक्षात घेऊन अखेर महायुतीकडून उत्तर मध्य मुंबईतील भाजपच्या जागेवर ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम (Adv Ujjwal Nikam) यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे. पण त्यामुळेच या मतदारसंघात असणारी एकगठ्ठा मुस्लिम मतं निर्णायक ठरणार आहेत हे निश्चित.
भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते, भाजपातील एकमेव पॉवर ब्रोकर अशी प्रतिमा असलेले प्रमोद महाजन यांच्या वारस असल्यामुळे खरंतर पूनम महाजन यांना सर्वप्रथम उमेदवारी मिळाली होती. अर्थात त्या अभाविप आणि युवा मोर्च्याच्या उत्तम कार्यकर्त्या होत्याच, पण महाजनांची कन्या हे त्यांचे तेव्हा उमेदवारी मिळवण्याचे ऍडीशनल क्वालिफिकेशन ठरले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पूनम महाजन यांना ४,७८,५३५ इतकी ५६ टक्के मतं मिळाली होती तर प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या प्रिया दत्त यांना ३५ टक्के, म्हणजेच २,९१,७६४ इतकीच मतं मिळाली होती. त्यानंतर संपूर्ण देशात २०१९ ला नरेंद्र मोदींची लाट होती, मात्र ही लाट असूनही पूनम महाजन यांचे मताधिक्य जवळपास ५६००० मतांनी घटले. मोदी लाटेत त्यांना ५४ टक्के इतकी, ४,८६,६७२ एवढीच मतं मिळाली पण मोदी लाट असताना देखील प्रिया दत्त यांनी त्यांची मतं २०१४ निवडणुकीपेक्षा ५ टक्क्यांनी वाढवत नेऊन ४० टक्के करत ३,५६,६६७ मतं पटकावली. तेव्हापासूनच खरंतर पूनम महाजन यांचा आलेख येथील मतदारसंघात आणि दिल्लीमध्ये पक्ष नेतृत्वाच्या नजरेत उतरायला लागला होता. यावेळी तर म्हणावे तसे काम त्यांनी मतदारसंघात केलेले नाही असा आक्षेप नागरिकांनी तर घेतला होताच, पण भाजपच्या तीनही सर्व्हेक्षणांमध्ये देखील पूनम यांच्याबद्दल संपूर्णपणे नकारात्मकता दिसून आल्याचे भाजपच्या अंतर्गत गोटात बोलले गेले.
या लोकसभा मतदारसंघात चांदीवलीचे आमदार दिलीप लांडे, विलेपार्लेचे आमदार ऍड. पराग अळवणी, वांद्रे पश्चिमचे ऍड. आशिष शेलार आणि कुर्ला येथील मंगेश कुडाळकर असे चार जण महायुतीचे लोकप्रतिनिधी आहेत. तर संजय पोतनीस हे कलिनाचे आमदार शिवसेना उबाठा गटात आहेत. वांद्रे पूर्वचे आमदार झिशान सिद्दीकी हे नावाला काँग्रेसकडे असले तरी त्यांचे वडील बाबा सिद्दीकी हे आता अजित पवार यांच्या बरोबर आहेत. महाविकास आघाडीने इथून मुंबई अध्यक्षा वर्षाताई गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. त्यांची उमेदवारी जाहीर होताच, इच्छुक असणाऱ्या नसीम खान यांनी बंडाचा झेंडा उभारला आहे. मात्र या बंडाचा आणि बाबा सिद्दीकी अजित पवारांकडे असल्याचा काही फायदा भाजपला मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणासाठी होईल याची शक्यता ऍड. उज्ज्वल निकम यांच्या उमेदवारीने धूसर केली आहे. सरकारी वकील असल्याने कित्येक गुन्ह्यांमध्ये त्यांनी घेतलेली बाजू ही मुस्लिम विरोधी बाजू आहे असा त्यांच्यावर मुस्लिम समाजाचा ठपका आहे , आणि त्यामुळेच ही मतं काही त्यांना मिळू शकतील याची शक्यता नाहीच. उलट ती आता भाजप विरोधातच एकवटणार आहेत. फक्त ती एकगठ्ठा मतं काँग्रेसकडे जाणार नाहीत यासाठी आता भाजपचे महाराष्ट्रातील सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस काय चाल खेळतात, कुठल्या पक्षाकडून मुस्लिम उमेदवार इथून उभा राहतो, त्याला उभा केला जातो, यावरच महायुतीचे बरचसे गणित अवलंबून राहणार आहे. कारण या मतदारसंघात जवळपास २६ टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुस्लिम मतदार आहेत. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघापैकी सर्वात जास्त मुस्लिम मतदार या लोकसभा मतदारसंघात आहेत जे इथे निकालात फरक पाडू शकणार आहेत.
२००९ साली काँग्रेसच्या प्रिया दत्त यांच्या विरोधात भाजपने अत्यंत ज्येष्ठ आणि ख्यातनाम वकील ऍड. महेश राम जेठमलानी यांना उभे केले होते. पण या निवडणुकीत जेठमलानी यांना फक्त १,४४,७९७ इतकीच म्हणजे फक्त २२ टक्के मतं मिळाली होती. अर्थात तेव्हा इथून मनसेच्या शिल्पा अतुल सरपोतदार यांनी तब्बल २० टक्के म्हणजेच १,३२,५४६ एवढी मतं घेतली होती. या निवडणुकीत प्रिया दत्त ४८ टक्के म्हणजेच ३,१९,३५२ एवढी मतं घेऊन भाजपच्या ऍड. जेठमलानी यांना हरवून विजयी झाल्या होत्या. आता मनसे महायुती बरोबर आहे. अर्थात तेव्हा नरेंद्र मोदी या नावाचा उदय झालेला नव्हता हे देखील विसरून चालणार नाही. २०१४ मध्ये तो झालेला असल्याने पूनम महाजन या तारून जाऊ शकल्या हे जरी खरं असलं तरी २०१९ ला मोदी लाट सर्वात मोठी असताना देखील पूनम महाजन यांचे मताधिक्य कमी झाले होते हे पण लक्षात घेतले पाहिजे.
ऍड. निकम यांच्यामुळे नॉन पॉलिटिकल फेस भाजपने मुद्दामच या मतदारसंघात दिला आहे असे बोलले जाते. मुंबईतील बॉम्बस्फोट आणि २६/११ चा दहशतवादी हल्ला हे दोन अत्यंत महत्त्वाचे खटले निकम यांनी लढवले आहेत. देश पातळीवर सरकारने उचललेली पावले, ३७० कलम, ३५ ए, प्रभूश्रीराम मंदिर, लव जिहाद, लॅन्ड जिहाद या प्रकरणात घेतलेले निर्णय, याचा फायदा ऍड निकम यांना होणार आहे. पूनम महाजन यांच्याबद्दल मतदारसंघात असणाऱ्या प्रचंड नाराजीला आशिष शेलार, पराग अळवणी ही जोडगोळी कुठल्या प्रकारे हाताळते, मुस्लिम मतांचे विभाजन कशा प्रकारे केले जाते यावर येथील मतांचे गणित ठरणार आहे.