ताज्या बातम्या मुंबई

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात नमो महारोजगार मेळावा

तरुणाईच्या रोजगारासह “राजकीय रोजगार आणि पुनर्वसनासाठी” इच्छुकांची मेळाव्याला झालर

X: @therajkaran

बारामतीचा रोजगार मेळावा हा रोजगाराच्या संधी किती उपलब्ध झाल्या ,यापेक्षाही अजितदादा आणि सुप्रियाताई यांच्या अबोल्यामुळे जास्त गाजला. आता ६ व ७ मार्च रोजी मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यात तब्बल अडीचशे कंपन्यांचा सहभाग असलेला मेळावा होत असून , रोजगार इच्छुक तरुणाई बरोबरच , राजकीय रोजगार आणि पुनर्वसनासाठी देखील अनेक इच्छुक या मेळाव्यासाठी हिरीरीने कार्यरत झालेले दिसत आहेत.

टाटा स्टील, टी सी एस, गोदरेज , एल अँड टी , कोकाकोला , जिंदाल, अमेझॉन , सिप्ला , केलोग्ज , केपजेमिनी , आयसीआयसीआय, एलआयसी अशा मान्यवर कंपन्यांचा सहभाग या मेळाव्यात आहे. या माध्यमातून शेकडो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर केंद्रातील अनेक प्रोजेक्ट राज्यामध्ये पूर्ण जोमाने राबवले. त्यातलाच एक प्रोजेक्ट म्हणजे हा महारोजगार मेळावा. तरुणाईला आणि स्वाभाविकच त्यांच्या पालकांना भुरळ घालणारा , रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा हा मेळावा असल्याने त्याला प्रतिसाद ही उत्तम मिळत आहे.

पण मेळावा रोजगाराचा असला तरी राजकारण आलेच , हे बारामतीच्या मेळाव्याने महाराष्ट्राला कालच दाखवून दिले आहे. त्यातून निवडणुकीचे राजकारण म्हणजे असले विविध विषयांवरील मेळावे हे राजकीय रोजगार आणि पुनर्वसनासाठीची ,आपले मूल्य दाखवण्याची, कार्यकर्त्यांपासून ते दुसऱ्या तिसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांसाठी चालून आलेली संधीच असते. ठाण्यात होणाऱ्या मेळाव्याकडे ठाणे, पालघर, रायगड येथील सत्ताधाऱ्यांमधील तीनही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते याच दृष्टिकोनातून बघत आहेत. लोकसभा निवडणुकानंतर पावसाळा संपला की लगेचच विधानसभा , महापालिका निवडणुका जाहीर होतील. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाफुटीनंतर राज्यातील राजकीय आणि सामाजिक समीकरणे पूर्णपणे ढवळून निघाली आहेत, त्यामुळे प्रत्येक पक्षात इच्छुकांची मांदियाळी आहे.

लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकांचा राजकीय कॅनव्हास हा खूप मोठा असतो. तरीदेखील एकाच मतदारसंघातून प्रत्येक राजकीय पक्षांत उमेदवारी मिळवण्याची साठमारी नेहमीच बघायला मिळते. महाराष्ट्रातील मोठ्या राजकीय फुटीनंतर नवीनच बनलेल्या युती आणि आघाडी मध्ये तर आता एका जागेसाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्या पार्श्वभूमीवर लोकसभेनंतर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून , ठाण्यातल्या महारोजगार मेळाव्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी , कार्यकर्ते आपआपल्या प्रभागांतून जास्तीत जास्त तरुणाईला या रोजगार मेळाव्याकडे कसे आकर्षित करता येईल याचा तयारीत गुंतलेले आहेत. आपल्या प्रभागात या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मतदारांपर्यंत पोहचणे, त्या अनुषंगाने आपण स्वतःही मतांची बेगमी करून ठेवणे व पक्षीय नेतृत्वाकडे आपले राजकीय मूल्य वाढवणे हा दुहेरी हेतू साध्य करण्याच्या मनसुब्याने कामाला लागले आहेत.

लोकसभेचा बिगुल आता लवकरच वाजेल ,रणधुमाळी उठेल , पण त्याच जोडीला विधानसभा आणि स्थानीय स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या लढाईची बीज पण त्यात पेरलेली असतील हे निश्चित.

अजय निक्ते

अजय निक्ते

About Author

अजय निक्ते (Ajay Nikte) हे गेली २८ वर्षे मेनस्ट्रीम पत्रकारितेत कार्यरत आहेत. सामाजिक,सांस्कृतिक, कलाक्षेत्र ते गुन्हेगारी अशा विविध ठिकाणी त्यांची लेखणी लिहिती असली तरी , राजकीय पत्रकारिता हा त्यांचा आवडता विषय आहे. बातमी मागची बातमी आणि संबंधित विषयातील करंट अंडरकरंट्स अचूक हेरून ते लिखाणात उतरवणे ही त्यांची खासियत आहे. अजय उवाच या नावाने ते विविध विषयांवर ब्लॉगही लिहितात.यासह अभिनय ही त्यांची पॅशन असून ,अनेक मराठी ,हिंदी चित्रपट, सिरियल्स ,जाहिराती, शॉर्टफिल्म्स मध्ये त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला आहे. "मीडिया ,जर्नालिसम आणि ग्लॅमरवर्ल्ड" या विषयात, पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी ते अनेक संस्थांमध्ये व्याख्यानं देतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्वतःचे आमदार निवडून आणायला शिका : राज ठाकरेंचा भाजपाला टोला

Twitter : @therajkaran पनवेल भारतीय जनता पक्षाने आपल्याला युतीची ऑफर दिली होती असा दावा करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज