पुणे: “एकल महिलांच्या आयुष्यातील आव्हाने अद्याप गंभीर स्वरूपाची आहेत. त्यांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा घडवण्यासाठी शासन पातळीवरील प्रयत्नांसोबतच स्वयंसेवी संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे. समाजाने महिलांना अधिक सक्षम, आत्मनिर्भर आणि सन्माननीय स्थान द्यावे, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे यांनी केले.
सहाय्यक आयुक्त कार्यालय, समाज कल्याण पुणे आणि एकता ग्राम विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय एकल महिला परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे यांनी मार्गदर्शन केले.
नंदिनी आवडे म्हणाल्या, “या परिषदेने महिलांच्या अनेक मूलभूत प्रश्नांवर प्रकाश टाकला आहे. केरळमधील महिलांना एकाच ठिकाणी सर्व आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करण्याची व्यवस्था आदर्श आहे. अशा प्रभावी कल्पना महाराष्ट्रातही राबविल्या जाव्यात. तालुकानिहाय एकल महिलांचा डेटाबेस तयार करण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन व्हावी, तसेच जनजागृतीसाठी उपक्रम राबवावेत. या विषयातील अनुभवांचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी एकता संस्थेने पुढाकार घ्यावा,” अशी सूचना त्यांनी केली.

महिला आणि बालविकास सहआयुक्त राहुल मोरे यांनी विविध योजनांची माहिती दिली, तर उपायुक्त सुवर्णा पवार यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन करत असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला आणि एकता संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.
यशदा चे माजी संचालक रविंद्र चव्हाण यांनी कार्यक्रमाचे संचालन करताना महिला हक्क चळवळीतील अनुभव आणि भावी दिशा स्पष्ट केली. एकता संस्थेच्या संचालिका रोहिणी सानप–निंबोरे यांनी राज्यभर महिला सक्षमीकरणासाठी अधिक व्यापक काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.
या परिषदेला पुणे, कोल्हापूर, नाशिक, सातारा, सोलापूर, चंद्रपूर, रायगड, रत्नागिरी, नवी मुंबई, शिर्डी आदी जिल्ह्यांतील महिला कार्यकर्ती आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकिशोर लोंढे यांनी केले.

