X: @ajaaysaroj
जागावाटप अंतिम टप्प्यात आले तरी नाशिक लोकसभेचा तिढा काही सुटत नाहीये. महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही ठिकाणी इच्छुकांसाठी येथील जागेवरील द्राक्षे राजकीयदृष्ट्या आंबटच ठरताना दिसत आहेत.मविआने उमेदवार जाहीर केला तरीही आणि महायुतीच्या मॅरेथॉन बैठका रोज होत असल्यातरीही , नाशकातल्या मळ्यातील उमेदवारीची गोड द्राक्षे नक्की कोणाच्या मुखात पडणार आहेत, व कोणासाठी ती आंबटच राहणार आहेत हे अजून स्पष्ट झालेले नाही.
नाशिकच्या लोकसभा उमेदवारीने राज्यातील सत्ताधारी व विरोधी अशा दोन्ही घटकांना पार जेरीस आणले आहे. महाविकास आघाडीतील उबाठा गटाने येथून राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी काँग्रेस आणि शरद पवार गट यांना विश्वासात घेऊन जाहीर केली आहे. मात्र उबाठाचेच नाशिक मधील जुने जाणते नेते विजय करंजकर यांच्या मनात मात्र आपला विश्वासघात झाला आहे अशी भावना निर्माण झाली आहे. करंजकर यांनी शाखाप्रमुख पदापासून ते थेट नाशिक जिल्हाध्यक्ष अशी पद भूषवली आहेत. भगूरच्या नगराध्यक्ष पदावर देखील त्यांनी काम केले आहे. मात्र यावेळी देखील त्यांचा पत्ता कट करण्यात आल्याने ते नाराज आहेत.
महायुतीच्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन घटक पक्षांमध्ये तर नाशिक लोकसभेच्या जागेवरून रणकंदन सुरू आहे. विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी तर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी जाऊन शक्तिप्रदर्शन करून दबावाचे राजकारण खेळत शिवसेनेच्या शिस्तबद्ध काराभरालाच तडा देत नवीन पायंडा पाडायला सुरवात केली आहे. मुख्यमंत्री पुत्र खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी एका भाषणात गोडसेंची उमेदवारी भाषणाच्या ओघात जाहीर केल्याने गोडसेंना जणूकाही दहा हत्तींचे बळ प्राप्त झाले आहे. दबावाची ही खेळी गोडसेंनी आज नाशकात देखील पुढे सुरूच ठेवली आहे. अजून उमेदवारीचा पत्ता नसताना गोडसे यांनी आज थेट शालिमार येथील हनुमान मंदिरात जाऊन प्रचार करायला सुरुवात केली आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गोडसेंना ५,६३,५९९ अशी पन्नास टक्के मते पडली होती तर समीर भुजबळ यांना २४% म्हणजेच २,७१,३९५ इतकी मतं पडली होती. साडे पाच लाखांहूनही अधिक मते मिळवून लोकसभेचे खासदारपद भूषवत असताना हेमंत गोडसे हे विधानसभा निवडणुकीत मात्र शिवसेनेचा एकही आमदार निवडून आणू शकले नाहीत ही वस्तुस्थिती ते स्वतः आणि त्यांचे समर्थक सोयीस्करपणे विसरत असतील तरी महायुती मध्ये भाजपला विसरून चालणार नाहीये. त्यांना लोकसभेत अबकी बार चारसौ पार करायचे आहे व त्यासाठी भाजपला प्रत्येक जागा अत्यंत महत्त्वाची आहे. या मतदारसंघात नाशिक पूर्वचे राहुल ढिकले , नाशिकमध्यच्या देवयानी फरांदे , नाशिक पश्चिमच्या सीमा हिरे असे तीन आमदार भाजपचे आहेत. सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे आणि देवळालीच्या सरोज अहिरे हे राष्ट्रवादी मध्ये आहेत तर इगतपुरी मध्ये काँग्रेसचे हिरामण खासकर आमदार आहेत.
एकाही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा आमदार औषधाला पण नाही. जवळपास शंभर लोकप्रतिनिधी हे स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये भारतीय जनता पक्षाचे आहेत. हेमंत गोडसे हे तेंव्हा असणाऱ्या नरेंद्र मोदींच्या लाटेत, भाजपच्या मेहनतीमुळे निवडून आले आहेत असा थेट दावा भाजपचे तिन्ही आमदार आणि सर्व पदाधिकारी करतात. त्यामुळे आमदार देवयानी फरांदे यांनी देखील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, त्यांच्यासमोर नाशिक लोकसभेच्या फॅक्टस ऍण्ड फिगर ठेवल्या आहेत. भाजपचे नेते दिनकर पाटील यांनी तर गोडसे शंभर टक्के पराभूत होतील असेच सांगितले आहे.
गेल्या काही दिवसांत उमेदवारीच्या साठमारीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव देखील घेतले जाऊ लागले आहे. मात्र आपण उमेदवारी मागितलेली नाही आणि त्यासाठी आग्रही देखील नाही असे सांगत ,आपल्या नावाची चर्चा थेट दिल्लीच्या नेतृत्वाने केली असून याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही दुजोरा असल्याचे खोचकपणे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात गोंधळ उडाला आहे. माध्यमांसमोर येऊन , आपण तुमच्या मधलेच एक शिवसैनिक आहोत असे मानभावीपणे शिवसेनेला सांगायला देखील छगन भुजबळ विसरलेले नाहीत. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जर महायुतीला टाळी द्यायची ठरवलीच तर ही जागा मनसेला द्यावी अशी चाचपणी देखील सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
नाशिकच्या या राजकीय आखाड्यात आता जनार्दन शक्तीपीठ येथील शांतिगिरी महाराज व श्रीराम शक्तीपीठाचे सिद्धेश्वरानंद महाराज यांनी देखील उडी घेतली आहे. २०२७ मध्ये नाशिक येथे कुंभमेळा होत आहे , या पार्श्वभूमीवर या दोघांच्याही उमेदवारीकडे बघितले जात आहे. येत्या काही दिवसातच नाशिक येथील सर्वपक्षीय अंतिम उमेदवार समोर येथील तेव्हाच नाशकातल्या लोकसभेच्या कुंभमेळ्यात कोण शाही स्नान करते आणि कोणाच्या नशिबी आंबट द्राक्षे येतात याचे चित्र स्पष्ट होणार आहे.