मुंबई : महाराष्ट्रातील संयमी व सुसंस्कृत राजकारणी म्हणून ओळखले जाणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना ‘तुमचा नथुराम गोडसे करू का?’ अशी धमकी एका तथाकथित कीर्तनकाराने व्हिडिओद्वारे दिली. या घटनेने संतपरंपरेच्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून विरोधी पक्ष नेत्यांनी सरकारला धारेवर धरले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) चे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी या धमकीचा तीव्र शब्दांत निषेध करत, “वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचे भूषण आहे. पण काही विघातक प्रवृत्ती राजकीय कारणांसाठी या संप्रदायाचा गैरवापर करत आहेत. सरकारने तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी,” अशी मागणी केली.
खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील संताप व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, “महात्मा गांधींच्या खुनीला ‘नथुरामजी’ म्हणणाऱ्या तथाकथित प्रवचनकाराची मानसिकता उघडी पडली आहे. वारकरी संप्रदाय मानवता, सद्भावना, प्रेम यांचा संदेश देतो; मात्र हिंसक भाषा करणे ही लाजिरवाणी बाब आहे. राज्याचे गृहमंत्री यांनी याची गंभीर दखल घेऊन कठोरात कठोर कारवाई करावी,” असे आवाहन केले.
दरम्यान, विधानपरिषदेचे सदस्य सत्यजित तांबे यांनी थोरात यांच्यावर झालेल्या टीकेवर तीव्र प्रतिक्रिया नोंदवली. त्यांनी म्हटले की, “बाळासाहेब थोरात साहेबांवर टीका करताना विरोधक सुध्दा जपून शब्द वापरतात. पण संत-महात्म्यांची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात स्वतःला कीर्तनकार म्हणवणाऱ्या एका उद्धट व्यक्तीने त्यांच्याविषयी जे काही बोलले ते कोणत्याही वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांना मान्य नाही. ही टीका केवळ राजकीय नसून संगमनेरच्या सामाजिक घडीला बदनाम करणारी आहे.
सहकार, शिक्षण, कृषी, सांस्कृतिक सगळ्याच क्षेत्रात संगमनेर अग्रेसर आहे. सहकारी बँकांमध्ये ७००० कोटींच्या ठेवी आहेत, दररोज ९ लाख लिटर दूध व ७ लाख अंडी तयार होतात, राज्यातील उत्कृष्ट साखर कारखाना येथे आहे, पाच मेडिकल कॉलेज आहेत ज्यातील चार विरोधकांचे आहेत. २५,००० विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. निळवंडे धरणामुळे संगमनेरला आज २४ तास स्वच्छ पाणी मिळते. एकेकाळचा दुष्काळी तालुका आज सुजलाम-सुफलाम झाला आहे आणि यामागे स्व. भाऊसाहेब थोरात व बाळासाहेब थोरात यांचे योगदान आहे. कालच्या तथाकथित कीर्तनकाराची टीका ही संगमनेरचा अपमान आहे आणि संगमनेरची स्वाभिमानी जनता हे कधीही सहन करणार नाही.”