मुंबई: पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी देशभरातील बँक कर्मचारी व अधिकारी २७ जानेवारी रोजी देशव्यापी संपावर जाणार असल्याची घोषणा युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) च्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीसाठी आज मुंबईतील आझाद मैदानात सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनात २०० हून अधिक बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी उपस्थितांनी सरकारच्या भूमिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.
सरकार दोन वर्षांपासून जाणीवपूर्वक मौन बाळगते – देविदास तुळजापुरकर
धरणे आंदोलनाला संबोधित करताना युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सचे निमंत्रक कॉम्रेड देविदास तुळजापुरकर म्हणाले की, बँकर्सनी मान्य केलेल्या पाच दिवसांच्या आठवड्याच्या मुद्द्यावर सरकार गेली दोन वर्षे जाणीवपूर्वक मौन बाळगत आहे.
रिझर्व्ह बँक, नाबार्ड, सेबी तसेच केंद्र व राज्य सरकारांच्या कार्यालयांमध्ये पाच दिवसांचा आठवडा लागू असताना फक्त बँक कर्मचारी आणि अधिकारी यांनाच त्यापासून वंचित ठेवले जात आहे, ही सरकारची आडमुठी भूमिका असल्याचा आरोप त्यांनी केला. या अन्यायाविरोधात देशभरातील दहा लाखांहून अधिक बँक कर्मचारी व अधिकारी २७ जानेवारी रोजी संपावर जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
या धरणे आंदोलनाला विविध बँक कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी संबोधित केले. AIBOCच्या वतीने निलेश पवार, NCBEच्या वतीने वायबर अँटोनी, AIBOAच्या वतीने फ्रान्सिस, INBOCच्या वतीने सेबॅस्टिन, NOBOच्या वतीने योगेश बिडकर, तसेच INBEFच्या वतीने स्नेहल पेटकर यांनी आपली भूमिका मांडली.
कार्यक्रमाचा समारोप AIBEAच्या वतीने कॉम्रेड एन. शंकर आणि ललिता जोशी यांनी केला.
देशव्यापी संपामुळे २७ जानेवारी रोजी बँकिंग व्यवहारांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

