मुंबई : साप्ताहिक ‘आहुति’च्या हीरक महोत्सवी समारंभाचे अध्यक्षस्थान भूषविण्याची संधी मिळणे ही शतकमहोत्सवी विधानपरिषदेची देणगीच म्हणावी लागेल, अशा शब्दांत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
साप्ताहिक आहुतिचा हा हीरक महोत्सवी समारंभ अंबरनाथ येथील वडवली विभागातील रोटरी सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभाला प्रहारचे संपादक ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे आणि ठाणे जिल्हा माहिती अधिकारी व माहिती विभागाचे कोकण विभागीय प्रभारी उपसंचालक मनोज सानप यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
आमदार किसन कथोरे, डॉ. बालाजी किणीकर, अंबरनाथ नगराध्यक्ष तेजश्री विश्वजीत करंजुळे आणि बदलापूर नगराध्यक्ष रुचिता राजेंद्र घोरपडे हेही विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
अध्यक्षपदाची निवड हा सुखद धक्का
अध्यक्षस्थानावरून बोलताना योगेश वसंत त्रिवेदी यांनी आपल्या निवडीबाबत आश्चर्य व्यक्त केले.
ते म्हणाले, “गिरीश वसंत त्रिवेदी यांनी ‘आहुति’च्या संपादकपदाची धुरा स्वीकारल्यानंतर अनेक धक्के दिले; मात्र आज तर त्यांनी मला चक्क धक्का दिला. हीरक महोत्सवी समारंभाचे अध्यक्षस्थान माझ्याकडे देण्यात आले असल्याचे निमंत्रणपत्र मिळताच मी अचंबित झालो.”
शतकमहोत्सवी विधानपरिषदेचा संदर्भ
त्रिवेदी यांनी विधानपरिषदेच्या शतकमहोत्सवानिमित्त केलेल्या संपादन कार्याचा उल्लेख केला.
१९ फेब्रुवारी १९२१ रोजी नारायण गणेश चंदावरकर हे विधानपरिषदेचे पहिले सभापती झाले. त्यानंतरच्या १०० वर्षांच्या इतिहासात विधानपरिषदेतील कामकाजावर आधारित तीन महत्त्वाचे ग्रंथ – मुंबई राज्याची पुनर्रचना, अभिनंदन ठराव, आणि विधानपरिषदेने संमत केलेली विधेयके, ठराव व धोरणे – हे विलास मुकादम, किशोर आपटे आणि योगेश वसंत त्रिवेदी यांनी संपादित केल्याचे त्यांनी सांगितले.
सुमारे ९०० पानांचा हा ग्रंथ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद सभापती प्रा. रामभाऊ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसभापती डॉ. निलमताई गोऱ्हे आणि विधानमंडळ सचिव मेघना तळेकर यांच्या उपस्थितीत नागपूर येथे प्रकाशित झाला होता.
“याच कामामुळे मला ‘आहुति’च्या हीरक महोत्सवी समारंभाचे अध्यक्षस्थान देण्यात आले. हा अंबरनाथकरांचा गौरव असून, ही खऱ्या अर्थाने शतकमहोत्सवी विधानपरिषदेची देणगी आहे,” असे ते म्हणाले.
’आहुति’च्या ६० वर्षांच्या वाटचालीचा आढावा
योगेश त्रिवेदी यांनी आहुतिच्या साठ वर्षांच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले की,
अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर पर्यटन केंद्र म्हणून विकसित करणे, अंबरनाथ शहर स्वतंत्र करणे, अंबरनाथ तालुका स्थापन करणे, तसेच शिवदर्शन बंगला अंबरनाथ नगरपालिकेच्या ताब्यात आणणे – अशा अनेक मुद्द्यांवर आहुतिने ठाम भूमिका घेत प्रयत्न केले.
पत्रकारितेचा वसा आणि वारसा
प्रहारचे संपादक पद्मभूषण देशपांडे हे आपले गुरुबंधू असल्याचे सांगत त्रिवेदी म्हणाले की, बाळासाहेब देशपांडे आणि वसंत त्रिवेदी हे सच्चे मित्र होते. राष्ट्र सेवा दल आणि समाजवादी चळवळीतून आलेल्या या दोघांनी प्रामाणिक, निष्पक्ष आणि निष्ठावंत पत्रकारिता केली.
“आजही तोच वसा आणि वारसा पुढे नेण्याची गरज आहे,” असे त्यांनी नमूद केले.
राजकारणावर परखड भाष्य
मनोज सानप यांनी आपल्या नावात आईचा उल्लेख केल्याचा संदर्भ घेत त्रिवेदी म्हणाले की,
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि ‘आई’ या संकल्पनांना मान मिळत आहे. मात्र, ज्यांनी या व्यक्तींचे विचार प्रत्यक्ष अनुभवले नाहीत, तेच आज त्यांच्या नावाने राजकारण करत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
“पूर्वी ‘ए आये’चा जमाना होता, आता ‘ए आय’चा जमाना आहे,” असे सूचक विधान करत त्यांनी प्रचलित गलिच्छ राजकारणावर जोरदार टीका केली.

