मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल काल गुरुवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला. शिवसेनेचा निर्णय देताना ज्या मुद्द्यांचा आधार घेण्यात आला होता, त्याच आधारावर नार्वेकरांनी राष्ट्रवादीचाही निकाल दिला. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील एकही आमदार अपात्र नसल्याचा निर्वाळा देण्यात आला. मात्र राष्ट्रवादी शरद पवार गट या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावणार आहे.
विधीमंडळात अजित पवार गटाचे ५३ पैकी ४१ आणि उर्वरित १२ आमदार शरद पवार गटाचे आहेत. त्याशिवाय अजित पवार गटाच्या बहुमताला शरद पवार गटाने आव्हान दिलेलं नाही. त्यामुळे मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचाच आहे, असं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणतीही फूट पडलेली नाही. तर दोन गट तयार झाले आहेत. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी पक्षाच्या अध्यक्षपदावर दावा केला आहे. तसेच पक्षाध्यक्षपदी आता जे आहेत, त्यांची निवड योग्य प्रक्रियेनुसार झाली नसल्याचाही दावा दोन्ही गटांनी केला होता. ३० जून २०२३ रोजी अजित पवारांना पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. शरद पवार गटाने या प्रक्रियेला विरोध केला होता. यामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्याचे ३० जून रोजीच स्पष्ट झाले होते. अजित पवारांची निवडणूक पक्षघटनेच्या विरोधी आहे असा दावा शरद पवार गटाने केला आहे. पक्षाचा अध्यक्ष कोण आहे? हे मी ठरवू शकत नाही, अशी माहिती राहुल नार्वेकर यांनी दिली.