X : @therajkaran
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कार्यपद्धतीचा उघडपणे पर्दाफाश होत आहे. विद्यार्थ्यांच्या नाव नोंदणीसारख्या अत्यावश्यक प्रक्रियेत होणारा विलंब म्हणजे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे आणि दुहेरी भूमिकेचे उत्तम उदाहरण ठरते. सुमारे एक लाख विद्यार्थ्यांची नाव नोंदणी अद्यापही प्रलंबित असून, यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे.
विद्यापीठ प्रशासनाने ‘धिंड काढायची आणि उरलेल्या तांदळाच्या पुजारी व्हायचे’ हा दुर्दैवी दृष्टिकोन अंगिकारला आहे. महाविद्यालयांवर नियंत्रण ठेवण्यात ते संपूर्णपणे अपयशी ठरले आहे. ‘घराचे कळस उंच, पण पाया पोकळ’ अशा पायमोडी व्यवस्थेमुळे विद्यापीठाचा पाया खचला आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य प्रयोगाचा विषय नव्हे, पण सध्या विद्यापीठाच्या धोरणांमुळे तोच प्रयोग बनला आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते तथा युवकचे मुंबई अध्यक्ष ॲड.अमोल मातेले यांनी म्हटले आहे.
आमची ठाम मागणी आहे की विद्यापीठाने ही ढिसाळ व्यवस्थापनाची साखळी त्वरित थांबवावी. जर प्रशासनाने तातडीने योग्य पावले उचलली नाहीत, तर आम्ही या अन्यायाविरुद्ध संघर्ष करणार. ‘तोंडाने रामराम आणि पाठीमागे बामबाम’ हा दुहेरीपणा आता खपवून घेतला जाणार नाही. असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते तथा युवकचे मुंबई अध्यक्ष ॲड.अमोल मातेले यांनी दिला.
विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित ठेवणे ही विद्यापीठाची जबाबदारी आहे, प्रयोगशाळा नव्हे!