MUHS FIST-25 उद्घाटन सोहळा संपन्न
नागपूर : आदिवासी भागातील आरोग्य समस्यांवर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक असून, त्यासाठी व्यापक जनजागृती होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन गोव्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित MUHS FIST-25 परिषदेत ते बोलत होते.
उद्घाटन सोहळ्याला राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, MUHS कुलगुरू ले. जन. माधुरी कानिटकर (निवृत्त), AIIMS नागपूरचे संचालक डॉ. प्रशांत जोशी, प्रति-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, परिषद संयोजक डॉ. संजीव चौधरी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
आदिवासी आरोग्य सुधारण्यावर भर
डॉ. सावंत म्हणाले की, आदिवासी भागात सिकलसेल अॅनिमिया, कुपोषण यांसारख्या आजारांचे प्रमाण अधिक आहे. त्यावर उपाय शोधण्यासाठी ही परिषद उपयुक्त ठरेल. आदिवासी संस्कृती आणि परंपरा जपण्याबरोबरच त्यांच्या आरोग्य सुधारासाठीही प्रयत्न होणे आवश्यक आहे.
आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनीही आदिवासी समाजाच्या आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे सांगितले. केंद्र आणि राज्य सरकारतर्फे विविध आरोग्य उपक्रम राबवले जात असून, त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
आरोग्य धोरणांसाठी उपयुक्त ठरणार – राज्यपाल राधाकृष्णन
विद्यापीठाचे कुलपती आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या. ब्रेस्ट कॅन्सर, लिव्हर डिसीज, सिकलसेल अॅनिमिया, ओरल कॅन्सर आणि कुपोषण यावर संशोधन सुरू असून, या परिषदेतील निष्कर्ष शासनाच्या आरोग्य धोरणांसाठी उपयुक्त ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
AIIMS नागपूरचे संचालक डॉ. प्रशांत जोशी यांनी सांगितले की, आदिवासी भागातील आरोग्य समस्या सोडवण्यासाठी MUHS FIST-25 उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावेल.
परिषदेस मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक व अधिकारी उपस्थित होते. परिषद संयोजक डॉ. संजीव चौधरी यांनी आभार मानले.