बंदरे व मत्स्य व्यवसाय विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन
मुंबई – गेट वे ऑफ इंडिया जवळील रेडिओ क्लब येथे प्रवाशांना सुलभ आणि सुरक्षित सागरी प्रवासासाठी आणखी एक आधुनिक व सुसज्ज प्रवासी जेट्टी लवकरच कार्यान्वित होणार आहे. या नव्या प्रवासी जेट्टी आणि टर्मिनल इमारतीच्या भूमिपूजन समारंभाचा शुभारंभ राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरविकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गुरुवारी पार पडला. यामुळे आबालवृद्ध, महिला आणि लहान मुलांसह नियमित सागरी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी होणार आहे.
महायुती सरकार स्थापन झाल्यापासून जलद कामगिरी
राज्यात दीड महिन्यांपूर्वी मोठ्या बहुमताने महायुती सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर वैभववाडीचे आमदार व कट्टर फडणवीस समर्थक नितेश राणे यांची वर्णी मत्स्य व्यवसाय व बंदरविकास मंत्री म्हणून लागली. पदभार स्वीकारताच त्यांनी कोकणातील मच्छीमारांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी धडाक्यात काम सुरू केले.
त्यात मुंबईतील कोळीवाड्यांमधील सुविधा सुधारणा, मासे विक्रीच्या मंडईंचे व्यवस्थापन, ससून डॉक, भाऊचा धक्का येथील प्रवासी जेट्टींची पाहणी, मच्छीमारांसाठी डिझेल परतावा, मासे सुकवण्यासाठी व बोटी नांगरण्यासाठीच्या जागांवरील अतिक्रमण हटवणे यांसारख्या महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे. त्यांनी केवळ अधिकाऱ्यांवर अवलंबून न राहता स्वतः लक्ष घालून समस्यांवर उपाययोजना केल्या. त्यांच्या प्रयत्नांना विभागातील खालपासून उच्चपदस्थ अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही मोलाची साथ दिली.
त्याचाच दृश्यरूप परिणाम म्हणून रेडिओ क्लब येथील नव्या प्रवासी जेट्टी व टर्मिनल इमारतीच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. याप्रसंगी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, मुख्य अभियंता सुरेंद्र टोपले, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये, अधीक्षक अभियंता सुधीर देवरे आदी मान्यवर उपस्थित होते.
अशी असेल नवी जेट्टी
• टर्मिनल इमारत – ८० मीटर x ८० मीटर
• ३५० प्रवाशांची क्षमता असलेले अॅम्फीथिएटर
• बर्थिंग जेट्टी आणि अप्रोच जेट्टी
• अग्निसुरक्षा प्रणाली आणि सीसीटीव्ही यंत्रणा
• गार्डनिंग आणि सौंदर्यीकरण
• भूगर्भीय चाचणी पूर्ण
नव्या जेट्टीमुळे प्रवाशांना मोठा दिलासा
या नव्याने प्रस्तावित आधुनिक जेट्टीमुळे भाऊचा धक्का, गेट वे ऑफ इंडिया, ससून डॉक येथून रेवस, मांडवा, घारापुरी, अलिबाग आदी ठिकाणी सागरी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक सुविधा मिळणार आहेत. सध्या कार्यरत प्रवासी जेट्ट्यांवरील ताणही मोठ्या प्रमाणावर कमी होईल, असा विश्वास महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.