अंबरनाथ: अंबरनाथ येथील मिरॅकल केबल कंपनीने नियमबाह्य पद्धतीने 259 कामगारांना कामावरून काढल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र परिश्रम संघाने आक्रमक भूमिका घेतली आहे. संघटनेचे अध्यक्ष आणि भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी स्पष्ट केले की, या कामगारांना पुन्हा कामावर घेतल्याशिवाय कंपनी व्यवस्थापनाशी कोणतीही चर्चा केली जाणार नाही.
कंपनीच्या गेटवर झालेल्या द्वारसभेत पवार यांनी कंपनी आणि कामगारांचे हित जपणारी संघटना म्हणून महाराष्ट्र परिश्रम संघ कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच, हाऊस किपिंगच्या नावाखाली कंपनीत 260 कामगारांकडून मुख्य स्वरूपाचे काम करवून घेतले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.
कंत्राटी पद्धतीने नियमबाह्य भरती होऊ देणार नाही
एनआरसी आणि अदानी कंपन्यांतील कामगार समस्यांसाठी लढा देत असतानाच, मिरॅकल केबल कंपनीतील कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठीही संघर्ष करू, असा इशारा त्यांनी दिला. कर्मचार्यांना अन्यत्र हलवले जाणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत अनधिकृत कंत्राटी भरती होऊ देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांपर्यंत दाद, 3 दिवसांची अंतिम मुदत
कंपनी व्यवस्थापनाच्या या मनमानी कारभाराविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याच्या कामगार मंत्र्यांकडे तक्रार करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. तसेच, व्यवस्थापनाने 3 दिवसांत सकारात्मक निर्णय न घेतल्यास संघर्ष अनिवार्य असेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
संघर्ष टाळायचा असेल तर व्यवस्थापनाने कामगारांचे हक्क द्यावेत. कंपनी प्रगतीसाठी कर्मचारीही मनापासून प्रयत्न करतील, असे आवाहन नरेंद्र पवार यांनी केले.
या सभेला संघटनेचे सचिव दिलीपकुमार मुंढे, उपाध्यक्ष सुरेंद्रसिंग यादव, सहसचिव सुरेश सकपाळ, खजिनदार धनाजी घरत, दादाजी लिंडाईत, अरुण म्हात्रे, भीमराव बाविस्कर, मंगल सावंत आदी उपस्थित होते. यावेळी कंपनीच्या गेटवर महाराष्ट्र परिश्रम संघाच्या नामफलकाचे अनावरणही पवार यांच्या हस्ते करण्यात आले.