मुंबई : पाकपुरस्कृत दहशतवादाचा पूर्णतः नायनाट करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला असून, त्याच दृष्टीने नुकत्याच पार पडलेल्या ‘सिन्दूर ऑपरेशन’ द्वारे पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली. या यशस्वी कारवाईच्या पार्श्वभूमीवर पाकव्याप्त काश्मीर भारताने आपल्या ताब्यात घ्यावा, अशी ठाम भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज मांडली.
रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज दादर चैत्यभूमी ते इंदुमिल दरम्यान भव्य ‘भारत जिंदाबाद यात्रा’ काढण्यात आली. या यात्रेचे इंदुमिल येथे सभेत रूपांतर झाले. यावेळी झालेल्या प्रमुख सभेत ना. आठवले यांनी सिन्दूर ऑपरेशनमधील यश आणि भारतीय सैन्याच्या पराक्रमाबद्दल गौरवोद्गार काढले.
“पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतला आहे. आता त्या निर्धारानेच पाकव्याप्त काश्मीर भारताच्या पूर्ण ताब्यात घेतलाच पाहिजे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे हा भाग परत मिळवण्यासाठी भारताने निर्णायक पावले उचलली पाहिजेत,” असे आठवले म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितले की, “सिन्दूर ऑपरेशनच्या यशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांचे मनःपूर्वक अभिनंदन. देशाच्या सुरक्षेसाठी लढणाऱ्या जवानांचे शौर्य हे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे. मोदी सरकारने दहशतवाद्यांविरुद्ध निर्णायक भूमिका घेतल्यामुळे देशातील जनतेमध्ये विश्वास आणि आत्मभान निर्माण झाले आहे.”
या यात्रेत हजारो नागरिकांनी तिरंगा झेंडे घेऊन सहभाग घेतला. “भारत जिंदाबाद”, “पाकिस्तान मुर्दाबाद”, “आतंकवाद मुर्दाबाद”, “मोदींना सलाम” अशा घोषणांनी वातावरण देशभक्तीने भारून गेले होते.
या वेळी शक्तिमान फेम अभिनेते मुकेश खन्ना, ना. आठवले यांच्या पत्नी सौ. सीमा आठवले, अभिनेत्री तृप्ती भोईर, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, मुंबई कार्याध्यक्ष बाळासाहेब गरुड, जिल्हाध्यक्ष संजय डोळसे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ना. आठवले यांनी सांगितले की, “रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये अशाच ‘भारत जिंदाबाद’ यात्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासोबतच इतर राज्यांमध्येही ही यात्रा काढण्यात येईल. मुंबईतील सर्व तालुका व जिल्ह्यांमध्ये भारत जिंदाबाद यात्रा उत्साहात पार पाडली जाईल.”