मुंबई : “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे विलिनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही, तो आमच्या विचाराधीनही नाही. त्यामुळे त्यावर चर्चा करणे अथवा भूमिका घेणे अनाठायी ठरेल,” अशी स्पष्ट भूमिका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत मांडली.
ते म्हणाले, “आम्ही सध्या एनडीएचा घटक आहोत आणि यापुढेही एनडीएमध्येच राहणार आहोत. या भूमिकेशी एकरूप होणाऱ्यांचे पक्षात स्वागत आहे. विलिनीकरणाचा विषय आमच्या स्तरावर अस्तित्वातच नाही. माध्यमांमध्ये चाललेल्या चर्चांना कोणतीही तथ्यात्मक बैठक नाही.”
“आजतागायत अशा कोणत्याही प्रस्तावाची चर्चा झाली नाही. त्यामुळे विरोध असणे, समर्थन करणे किंवा भूमिका घेणे, या गोष्टीच अमान्य आहेत. जे अस्तित्वातच नाही त्यावर बोलणे म्हणजे वेळ आणि शब्दांचा अपव्यय,” असेही त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.
नेतृत्वावर विश्वास, भूमिका ठाम
“पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्त्वात आमचा पुढचा राजकीय प्रवास ठरलेला आहे. आम्ही एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय सामूहिकरीत्या घेतला. यामध्ये अजित पवार, प्रफुल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे यांचा सहभाग होता. आमदार आणि जनतेचीही मोठी साथ मिळाली,” असे तटकरे यांनी नमूद केले.
माध्यमांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना तटकरे यांनी मिश्कील टिप्पणी करत म्हटले, “जर कुणाकडे असा प्रस्ताव असल्याची माहिती असेल, तर मला जरूर कळवा. मी दुर्बिण लावून शोध घेईन.”
“लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी आमच्या पक्षाकडे फक्त ५-६ जागा येतील, असे भाकीत केले जात होते. पण आम्ही ‘जनसन्मान यात्रा’, ‘लाडकी बहीण’ योजना, विविध निर्णय आणि जनतेशी साधलेला थेट संवाद यामुळे राज्यात सकारात्मक वातावरण निर्माण केले. शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांपासून आम्ही तसूभरही ढळलो नाही. यामुळे जनतेने आम्हाला भरभरून पाठिंबा दिला,” असेही त्यांनी सांगितले.
“लोकसभेनंतर आम्ही एनडीएमध्ये राहतो की नाही, असा प्रश्न निर्माण केला गेला होता. पण आता जनतेनेच त्याचे उत्तर दिले आहे. त्यामुळे ‘जर-तर’च्या मुद्द्यावर मी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून वक्तव्य करणे योग्य ठरणार नाही. विलिनीकरणावर चर्चा करायची असेल, तर आधी असा प्रस्ताव असणे आवश्यक आहे. जे नाहीच ते गृहित धरून बोलण्यात काही अर्थ नाही. आता ‘सूत्रां’वर आधारित बातम्या येत आहेत, पण कधी कधी ती सूत्रंही आम्हालाच शोधावी लागतात,” असे त्यांनी हसत सांगितले.
या पत्रकार परिषदेला पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.