अयोध्या
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशातील अयोध्येत महर्षी वाल्मीकी आंतरराष्ट्रीय हवाई तळ अयोध्या धामचं उद्घाटन केलं. यासोबतच १५,७०० कोटींच्या योजनांचं लोकर्पण आणि पायाभरणीदेखील केली. ते म्हणाले की, आज संपूर्ण जग मोठ्या उत्सुकतेने २२ जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची प्रतीक्षा करीत आहेत.
आज अयोध्या धाम रेल्वे स्थानक आणि अयोध्या विमानतळाचं उद्घाटन करण्यात आलं. अयोध्येतील राम मंदिराचं २२ जानेवारीला उद्घाटन होणार आहे. त्यामुळे या दिवशी देशातील सर्व नागरिकांनी दिवाळी साजरी करा, घराघरात दिवे लावून आनंद साजरा करा, असं नरेंद्र मोदींनी आवाहन केलं.
२२ जानेवारीला देशातील सर्व १४० कोटी नागरिकांनी घराघरात श्रीराम ज्योती लावा. अयोध्येत होत असलेल्या बांधकामामुळे प्रत्येक रामभक्ताला देवाचे दर्शन घेणे सोपे होणार आहे. हा ऐतिहासिक क्षण आपल्या आयुष्यात सुदैवाने आला आहे, अशा शब्दात मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अयोध्येतील भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, एक वेळ अशी होती की अयोध्येत राम लल्ला तंबूत बसले होते. आज केवळ रामलल्ला यांनाच कायमस्वरूपी घर मिळालेले नाही तर देशातील 4 कोटी गरीब जनतेलाही कायमस्वरूपी घर मिळाले आहे. आजचा भारत आपल्या तीर्थक्षेत्रांचे सुशोभीकरण करत आहे आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या जगातही यश मिळवित आहे.