X: @therajkaran
नांदेड: भारताचे नाव जगात उंचावले आहे . यापुढेही भारत जागतिक अर्थव्यवस्थेत तिसऱ्या क्रमांकावर राहील, याची मी गॅरंटी देत आहे. त्यासाठी पुन्हा एकदा भाजपला विजयी करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. कलम ३७०, राम मंदिर तसेच मुस्लिम महिलांना तीन तलाकपासून मुक्ती याबरोबरच जागतिक अर्थव्यवस्थेत सध्या भारत पाचव्या क्रमांकावर आहे. ही सर्व गॅरंटी मोदींनी पूर्ण केली . आता पुन्हा एकदा मोदी गॅरंटीसाठी आमच्या पाठीशी रहा, भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत तिसऱ्या क्रमांकावर आणण्याची माझी गॅरंटी आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
आपल्या २८ मिनिटांच्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी ‘नांदेड व हिंगोलीकरांना माझा नमस्कार’ अशा मराठी शब्दात भाषणाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी हुजूर साहेब या पवित्र नगरीत गुरुगोविंद सिंघजी व माहूरच्या रेणुका माता व दत्ताला साष्टांग नमस्कार केला. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या आकडेवारीवर बोलताना त्यांनी सर्व नागरिकांनी मतदान करावे, असे आवाहन केले. मतदान लोकशाहीला बळकटी देते. त्यामुळे कोणालाही मत द्या परंतु मतदान जरूर जरूर करा, असे आवाहन मोदी यांनी केले.
जागतिक स्तरावर भारताची एक वेगळी ओळख निर्माण करायची आहे. त्यासाठी मतदान करणे गरजेचे आहे. मतदान करत असताना इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदासाठी चेहरा नसल्याने त्यांना मतदान करून काय फायदा? असा प्रश्न उपस्थित करून काँग्रेसच्या नेत्यांनी सुरुवातीलाच पराजय स्वीकारला आहे, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. जे लोकसभेला निवडून येऊ शकत नाहीत अशांनी राज्यसभेच्या दारातून संसदेत प्रवेश मिळविला आहे. ते निवडणूक लढविण्यासाठी घाबरत आहेत, असा टोला सोनिया गांधी यांना पंतप्रधानांनी लगावला.
मोदी यांनी आपल्या भाषणातून काँग्रेस व इंडिया आघाडीवर टीका केली. इंडिया आघाडीवाले सनातनला आज शिव्या देत आहेत. राम मंदिरामध्ये होणाऱ्या पूजेला पाखंड म्हणत आहेत. अशा लोकांना तुम्ही मते देणार का? त्यांना कदापी माफ करू नका, असेही यावेळी मोदी म्हणाले. विकसित मराठवाडा व विकसित महाराष्ट्रासाठी महायुतीला विजयी करा, असे आवाहन करत नांदेड व हिंगोली येथून लोकसभेवर चिखलीकर व कोहळीकर यांनाच मतदान करून मला ताकद द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
इंडिया आघाडीत एकमत नसल्याचे सांगत २५ % जागांवर इंडिया आघाडीवालेच एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवत आहेत, असे मोदी यावेळी म्हणाले. इंडिया आघाडीचेच नेते एक दुसऱ्यांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. एकमेकांना तुरुंगात डांबण्याची भाषा करत आहेत. त्यातल्या त्यात राहुल गांधी यांना वायनाडमध्ये संकट दिसत असल्याने ते घाबरले आहेत. २६ एप्रिलनंतर ते अन्य दुसऱ्या सुरक्षित मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवीतील असा अंदाजही मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. ४ जूननंतर इंडिया आघाडीतील नेते एकमेकांशी भांडणार आहेत. एवढेच नव्हे तर ते स्वतःचे कपडे फाडून घेतील. स्वतःचे डोक्यावरचे केस ऊपटतील. अशा लोकांना मतदान करून मत वाया घालवायचे आहे काय ? विकसित भारतासाठी ‘फिर एक बार …’ असा नारा मोदी यांनी यावेळी दिला. काँग्रेस हा पक्ष दलित, वंचित व मजुरांच्या विकासाआड येत आहे, असे सांगून पन्नास कोटी गरीब नागरिकांचे बँकेत खाते उघडले तेव्हा या निरक्षर लोकांना डिजिटल पद्धतीचा काय फायदा अशी ओरड करून काँग्रेसने देशातील अशा गरीब जनतेबद्दल अविश्वास दर्शविला होता, याची आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणातून करून दिली.
१९८४ च्या शीखविरोधी घटनेचा बदला काँग्रेस आजही घेत आहे, असे सांगून अफगाणिस्तान येथील गुरु ग्रंथ साहिबचा हवाला देत भाजप शीख समाजाच्या पाठीशी आहे, असे सांगितले. मोदी यांची गॅरंटी हीच विकासाची गॅरंटी आहे, असेही आश्वासन त्यांनी आपल्या भाषणातून दिले. विकसित मराठवाडा व विकसित महाराष्ट्रासाठी मला ताकद द्या, जास्तीत जास्त उमेदवार महायुतीचे निवडून आला, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.