X : @MilindMane70
मुंबई – महाराष्ट्र विधानसभेच्या (Assembly Election) निवडणुकीला अद्याप दोन महिन्याचा अवधी असला तरी कोकणातील (Konkan) रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात गोकुळाष्टमीपासून (Gokulashtami) राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात होणार आहे. गणेशोत्सव (Ganesh Festival) काळात राजकीय वातावरणाने पूर्ण कोकण ढवळून निघणार असल्याचे संकेत आतापासूनच मिळण्यास सुरुवात झाली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. विशेषत: कोकणात गोकुळाष्टमीनंतर येणाऱ्या गणेश उत्सव काळात मोठ्या प्रमाणावर चाकरमानी मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण, वसई, विरार, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, नाशिक यासह गुजरात, मध्य प्रदेश या राज्यासह देश विदेशातून गणेश भक्त कोकणात दाखल होतात.
कोकणातील गणेशोत्सव काळात गावोगावी बंद असलेली घरे या काळात उघडी असलेली पाहण्यास मिळतात. घराघरात गणपतीचे आगमन वाजत गाजत होत असल्याने या सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर लहान मुलांपासून आबाल वृद्धांपर्यंत कोकणात दाखल होतात.
कोकणात गोकुळाष्टमीच्या काळात देखील मोठ्या प्रमाणावर दहीहंडी उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. गावोगावी वाड्या-वाड्यांवर दहीहंडी बांधून गोकुळाष्टमी सण साजरा केल्याची उदाहरणे आहेत. मात्र हे वर्ष विधानसभा निवडणुकीचे असल्याने या गोकुळाष्टमीच्या काळात रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यात दहीहंडीला मोठ-मोठ्या रकमेची बक्षिसे लावणे, त्याचबरोबर दहीहंडी पथकांना वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून स्वतःच्या नावाचे व पक्षाचे चिन्ह असलेले टी-शर्ट वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला मोठमोठ्या बक्षीसांचे वाटप देखील विविध राजकीय पक्षांच्या माध्यमातून यावेळी दिली जाणार आहेत.
कोकणात गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सवापेक्षा घरगुती गणेशोत्सवाची संख्या मोठी आहे. मात्र, मुंबई – पुण्याप्रमाणे आता कोकणात देखील सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप काळानुरूप बदलले आहे. सार्वजनिक गणेशोत्सवांची संख्या देखील वाढली आहे. कोकणातील गावोगावी व वाड्या वाड्यावर मागील दहा वर्षात अनेक मंडळांच्या गणेशोत्सवाचे स्वरूप बदलले आहे. याचाच फायदा राजकीय मंडळींनी घेतला आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून मंडळांना बक्षीसे व बॅनरबाजी करून ही गणेश मंडळ आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्षाकडून होत आहे.
कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव काळातच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपल्या पक्षाला मतदान होण्यासाठी व आपणच उमेदवार असल्याने गावोगावी व वाड्या-वाड्यांवर विविध पक्षाचे राजकीय कार्यकर्ते व उमेदवार सार्वजनिक गणेशोत्सवापासून घरगुती गणेशाच्या दर्शनाला जाणार असल्याने कोकणात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव काळात राजकीय वातावरण तापलेले असणार आहे.
गणेशोत्सव काळात बॅनर, कमानी व नाचाचे जंगी सामने राजकीय आखाडे ठरणार!
कोकणातील रायगड जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ तर रत्नागिरी जिल्ह्यात पाच व सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघ येतात. कोकणात यापूर्वी पक्षभेद विसरून गणेशोत्सव व गोकुळाष्टमी सण साजरे केले जायचे. मात्र काळ बदलला व कोकणाने मुंबई पुण्यासारखे गोकुळाष्टमी व गणेशोत्सवातला सुरुवात केल्याचे चित्र अलीकडच्या काळात गावोगावी व वाड्यावाड्यांवर व तालुक्याच्या ठिकाणी पाहण्यास मिळत आहे.
यंदाचे वर्ष विधानसभा निवडणुकीचे असल्याने गणेशोत्सव काळात करमणुकीचे कार्यक्रम म्हणून कोकणातील शक्ती तुरे वाले हे नाचाचे जंगी सामने व त्यातून एकमेकांवर आरोपांच्या जुगलबंदी झडतील. यामुळे गणेशोत्सव काळात कोकणात वादाचे प्रसंग निर्माण होऊन त्याला राजकीय स्वरूप दिले जाण्याची शक्यता आहे. एकंदरी गोकुळाष्टमीनंतर येणारा गणेशोत्सव हा कोकणातील महत्त्वाचा असणारा सण, मात्र त्यात विधानसभेचा राजकीय आखाडा झाल्याचे चित्र वाड्यावाड्यांवर दिसणार आहे, एवढे मात्र खरे.