भाजपा नेते आ. आशिष शेलार यांचा उध्दव ठाकरेंना टोला
X : @NalawadeAnant
मुंबई – आमचाच मुख्यमंत्री.. शपथ कार्यक्रमाला या.. अशा वल्गना करणाऱ्या ठाकरे गटाचे तारे जमी पर आ गये, असे आजच्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यातील चित्र समोर आले असून ज्याचे आमदार जास्त त्यांना मुख्यमंत्रीपद हा महायुतीचा (Mahayuti) फॉम्युला होता, हेही सत्य आज उध्दव ठाकरे बोलून गेले. म्हणजेच त्यावेळी ते मुख्यमंत्री पद मागत होते, ते कपोलकल्पित होते, अशा शेलक्या शब्दांत मुंबई भाजपा (BJP) अध्यक्ष आमदार अँड. आशिष शेलार (MLA Ashish Shelar) यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना उध्दव ठाकरेंना (Uddhav Thackeray) जोरदार टोला लगावला.
महाविकास आघाडीच्या मेळाव्यानंतर प्रसार माध्यमांनी आ. शेलार यांना प्रतिक्रीया विचारली असता ते म्हणाले की, मुख्यमंत्री पदावरुन उध्दव ठाकरे यांनी आज जे विवेचन केले, त्यावरुन त्यांचे तारे जमी पर आ गये असे चित्र निर्माण झाले आहे. कारण २०२४ ला आमचाच महाराष्ट्रात चेहरा, आणि मुख्यमंत्रीपदी पुन्हा उध्दव ठाकरेच अशा वल्गना त्यांच्या गटाकडून करण्यात येत होत्या. त्यासाठी खुद्द उध्दव ठाकरेसह कुटुंब दिल्ली जाऊन आले, तरी मागणी मान्य होत नाही, सिव्हर ओकला बैठका झाल्या तरीही मागणी मान्य झाली नाही. त्यामुळे त्यांनी आज हे विधान केलेले स्पष्ट झाले असून आता त्यांच्यातली धुसमूस बाहेर येत ही लाथाबुक्यांपर्यंत जाऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कोरोना काळात (corona pandemic) ज्यांनी भ्रष्टाचार केले, पदवीधरांचे भविष्य विस्कटले, त्यांच्या मुख्यमंत्री काळात माता भगिनींवर अन्यायाचे पहाड कोसळावे, अशी परिस्थिती निर्माण केली, रोजगार निर्मितीचे (employment generation), आर्थिक गुंतवणुकीचे (investment) प्रस्ताव आले जे महाराष्ट्राच्या हिताचे होते त्याला विरोध केला. संपादकांना अटक, बोलू द्यायचे नाही, लोकशाहीला धोक्यात आणले. ज्यांनी महाराष्ट्रातील प्रकल्प रोखले, महाराष्ट्राला बदनाम केले त्या महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi), त्या महाराष्ट्र द्रोह्यांना तडीपार करणे, हद्दपार करणे, हाच आमचा कार्यक्रम असल्याचेही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.
……..तर सरडा ही आत्महत्या करेल
संजय राजाराम राऊत (Sanjay Raut) हे तर एवढे रंग बदलतात की सरडाही आत्महत्या करेल आणि सरड्याच्या कुटुंबाने तक्रार केली तर राऊत यांच्यावर गुन्हा दाखल होईल, असा टोलाही आ.शेलार यांनी लगावला आहे. कारण ते सीए (CA), शेतकरी (farmers), एनआरसी (NRC) सारखे कायदे आले की सभागृहात बाजू घेतात बाहेर येऊन विरोध करतात, त्यामुळे ते नेमके मातोश्रीच्या बाजूने आहेत की सिल्व्हर ओकच्या हेही लोकांना कळत नाही. कारण ते ज्या पध्दतीने रंग बदलत असतात त्यावरुन सरडाही आत्महत्या करेल, असाही मार्मिक टोला त्यांनी राऊत यांना लगावला.