मुंबई – महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला ‘कुणबी’ संबोधण्याचा जीआर काढून मोठा गाजावाजा केला. “भाजपने असा आव आणला की न सुटणारा प्रश्न त्यांनी सोडवला, पण प्रत्यक्षात हा निर्णय फसवणारा आहे,” अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आंबेडकर म्हणाले, “भाजपने मराठा आरक्षणासाठी नेमलेली शासकीय उपसमिती, न्या. शिंदे समिती, मराठा समाज, मनोज जरांगे पाटील आणि कुणबी या सर्वांना फसवले आहे.”
आंबेडकर यांनी जगन्नाथ डी. होल विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणातील मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल उद्धृत केला. त्यांनी स्पष्ट केले की, पॅराग्राफ 13 मध्ये न्यायालयाने म्हटले आहे की, सर्व मराठा समाजाला कुणबी म्हणता येणार नाही. त्याआधीच्या पॅराग्राफमध्ये “कुणबी ही जात नसून व्यवसाय आहे” असे नमूद आहे.
हा निर्णय सर्वोच्च न्यायालयातही कायम राहिलेला आहे. त्यामुळे “सर्व मराठे कुणबी आहेत” असा जीआर काढणे चुकीचे व दिशाभूल करणारे असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.
आंबेडकर पुढे म्हणाले, “ओबीसींनी आता स्वतःच्या हक्कासाठी उभे राहणे गरजेचे आहे. आंदोलन, मोर्चे, बैठका घ्याव्यात. ओबीसी मंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये दबाव आणला पाहिजे.”
आंबेडकर यांनी ठामपणे स्पष्ट केले की, “मराठा आरक्षणाचे ताट वेगळे आणि ओबीसी आरक्षणाचे ताट वेगळे असले पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असल्यास त्यांचा स्वतंत्र कोटा असला पाहिजे. मात्र, सर्व मराठ्यांना कुणबी समजावेत असा जीआर काढून भाजपने अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, मराठा समाज आणि ओबीसी समाज – सर्वांनाच गंडवले आहे.”