नवी दिल्ली
जगभरातील कलावंत म्युझिक इंडस्ट्रीशी संबंधित या खास ग्रॅमी अवॉर्ड्सची आतुरतेने वाट पाहत असतात. ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 मध्ये 94 विविध श्रेणीतील विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हॉलिवूडचे अनेक गायक आणि संगीतकारांना यात यश मिळालं असून भारतातील चार रत्नांनी देशाचा गौरव केला आहे.
या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले ‘अबँडन्स इन मिलेट्स’ हे गाणे देखील ग्रॅमी पुरस्कारांच्या नामांकनांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलं होतं. मोदींच्या या गाण्याला ‘बेस्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स’ श्रेणीत नामांकन मिळाले होते. मात्र या गाण्याला मागं टाकत झाकीर हुसैन यांच्या ‘पश्तो’ गाण्याने बाजी मारली आहे.
‘अबँडन्स इन मिलेट्स’ हे गाणं पंतप्रधान मोदी आणि भारतीय अमेरिकन गायिका फालू शाह आणि त्यांचे पती गौरव शाह यांनी मिळून लिहिले आहे. हे गाणे फाल्गुनी शाह आणि गौरव शाह यांनी गायले आहे. या गाण्यात पीएम मोदींचे जेवणासंबंधीचे भाषणही आहे.
एखाद्या राजकारण्याला ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं सांगण्यात येत आहे. पीएम मोदींनी लिहिलेले हे गाणे गेल्या वर्षी 16 जून 2023 रोजी रिलीज झाले होते. इतर गाण्यांप्रमाणे, या गाण्यात देशातील बाजरीची लागवड आणि धान्य म्हणून त्याचे फायदे सांगते, सांगण्यात आले आहेत.
या गाण्याचा उद्देश शेतकऱ्यांना बाजरी पिकवण्याचा संदेश देण्याचा होता, जेणेकरून जगातील भुकेची समस्या संपुष्टात येईल, असे सांगण्यात आले आहे. झाकीर हुसेन यांच्या व्यतिरिक्त ‘ग्लोबल म्युझिक अल्बम’ या विभागाअंतर्गत शंकर महादेवनच्या ‘शक्ती’ बँडला ‘दिस मोमेंट’साठी हा पुरस्कार मिळाला आहे.