By: Abhaykumar Dandge
X : @therajkaran
नांदेड: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज धावती नांदेड भेट झाली. त्यांचे आज नांदेडमध्ये श्री गुरुगोविंदसिंघजी विमानतळावर स्वागत करण्यात आले. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या खासदारांसोबत तसेच आमदारांसोबत मोदी यांनी हितगूज साधून नांदेड जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती व निवडणूक तयारीवर चर्चा केली. कॉँग्रेसमधून भाजपवासी झालेले आणि लगेचक राज्य सभेच्या सदस्य पदाची लॉटरी लागलेले अशोक चावण यांनी मोदी यांचे विमानतळावर स्वागत केले.
पाच राज्यांच्या तीन दिवसीय दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आदिलाबादहून नांदेडमार्गे चेन्नईला जात असताना सुमारे १५ मिनिटे नांदेड येथील श्री गुरुगोविंदसिंघजी विमानतळावर थांबले होते. यावेळी जिल्ह्यातील आजी- माजी लोकप्रतिनिधी, भाजपचे पदाधिकारी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
नांदेडवासियांकडून स्वागत स्वीकारताना पंतप्रधानांनी काही मिनिटे थांबून उपस्थित खासदार व आमदारांशी छोटेखानी संवाद साधला. विमानतळावरून बाहेर पडताना या भेटीबाबत खासदार व आमदारांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. नांदेड जिल्ह्याचे वर्तमान राजकीय चित्र आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
Also Read: ‘या’ कारणासाठी भाजपचे उमेदवार उपेंद्र सिंह रावत यांनी घेतली लोकसभा निवडणुकीतून माघार