गडचिरोली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गडचिरोली जिल्ह्यातील सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने उचललेल्या पावलांचे जोरदार कौतुक केले आहे. ‘एक्स’ या समाजमाध्यमावर प्रधानमंत्री मोदी म्हणाले, “दुर्गम आणि माओवादग्रस्त भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो. यामुळे जीवन सुलभतेला चालना मिळेल आणि आणखी प्रगती साधण्याचा मार्ग प्रशस्त होईल. गडचिरोली आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशातील माझ्या बंधू भगिनींचे विशेष अभिनंदन!”
गडचिरोली जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकास योजनांनी या दुर्गम भागाच्या परिवर्तनाचा पाया रचला आहे. त्यांच्या उपस्थितीत काल सुरू झालेली अहेरी-गर्देवाडा बससेवा, गट्टा-गर्देवाडा-वांगेतुरी मार्गाचे लोकार्पण आणि ताडगुडा पुलाचे उद्घाटन अशा विविध प्रकल्पांच्या माध्यमातून या दुर्गम व माओवादग्रस्त भागातील दळणवळण सुलभ होणार आहे. याशिवाय, ११ जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याने नक्षलवादाच्या कडव्या संघर्षातही शांततेचा किरण दिसत आहे. लॉईड्स मेटल कंपनीच्या विविध प्रकल्पांमुळे रोजगाराच्या वाढीव संधी निर्माण होण्यासोबतच स्थानिक आर्थिक विकासाला गती मिळेल.
गडचिरोली जिल्ह्याचे विकासाच्या नव्या पर्वात पदार्पणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या उपक्रमाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचेकडून झालेल्या या कौतुकाने गडचिरोलीसह महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांना आणखी प्रोत्साहन मिळाले आहे.